भीक मागण्याच्या निमित्ताने घरात घुसून लूटमार करणाऱ्या महिला टोळीला माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. या महिलांनी दोन दिवसांपूर्वी माटुंगा येथे एका कार्यालयात एकट्या असणाऱ्या जेष्ठ नागरिकाला दमदाटी करून मोबाईल फोन आणि २ हजार रुपयांची रोकड चोरी करून पोबारा केला होता. ही टोळी चोरी करण्यासाठी लहान मुलींचा वापर करीत होती अशी माहिती समोर आली आहे. रेखा सतीश राठोड (३५), निली दिपू पवार (३०), मनीषा दीपु पवार (२०) असे अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. ही महिला टोळी गुजरात राज्यातील सुरत येथे राहणारी आहे. या टोळीमध्ये आणखी काही महिला आणि ८ ते १० वयोगटातील लहान मुलींचा समावेश आहे. (Mumbai Crime)
या टोळीने काही दिवसांपूर्वी माटुंगा येथील हिंदू कॉलनी दुपारच्या वेळी परिसरात एका कार्यालयात भीक मागण्याच्या निमित्ताने आत शिरले, त्यावेळी कार्यालयात ६५ वर्षाचे जेष्ठ गृहस्थ एकटेच होते. भीक मागण्याच्या नावाखाली आत आलेल्या दोन महिला आणि त्याच्या सोबत असणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींनी पाणी मागितले. जेष्ठ गृहस्थ यांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगून देखील या महिला आणि मुली बाहेर न जाता, कार्यालयात चोरीच्या उद्देशाने चाचपणी करून कार्यालयातील २ हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल फोन चोरी करून निघून गेल्या. (Mumbai Crime)
(हेही वाचा – Gyanvapi Case : ज्ञानवापी सर्वेक्षण प्रकरणी न्यायालयाचा पुरातत्व विभागाला दिलासा)
हा सर्व प्रकार कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. या महिला टोळीचा हा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेला व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर माटुंगा पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन या महिला टोळीचा शोध सुरू केला. गुरुवारी दुपारी ही टोळी माटुंगा परिसरात संशयास्पदरित्या फिरत असताना माटुंगा पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी तीन महिला आणि तीन अल्पवयीन मुलींना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणून चोकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. (Mumbai Crime)
माटुंगा पोलिसांना या महिलांच्या झडतीत ७ मोबाईल फोन आणि २ हजार रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेली टोळी ही गुजरात राज्यातील सुरत येथे राहणारी असून महिण्याभरापूर्वी ही टोळी मुंबईत आली असून त्यांनी नेहरू नगर, आरएके मार्ग आणि माटुंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केली असल्याची माहिती माटुंगा पोलिस ठाण्याचे वपोनि. दीपक चव्हाण यांनी दिली. या टोळीला अटक करण्यासाठी सह पोलीस उपनिरीक्षक पोपट मोकळ, मपोशि. प्रियांका जगदाळे, श्रीधर साळुंखे, रामदास माळी, सागर जगताप यांनी या टोळीचा शोध घेऊन त्यांना अटक केली. (Mumbai Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community