मुंबई महानगर पालिकेने रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या १० लाख रुपये किमतीच्या लोखंडी सळ्या चोरी प्रकरणात पोलिसांनी एका ट्रकचालकाला अटक केली आहे. समिमुल्ला शेख असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. चोरीचा प्रकार कांदिवली पूर्व येथे शुक्रवारी घडला असून रविवारी समता नगर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
( हेही वाचा : औरंगाबादमध्ये दुहेरी हत्याकांड! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह मुलीची हत्या )
कांदिवली पूर्व येथे रस्त्याच्या कामासाठी मुंबई महानगर पालिकेने लोखंडी सळ्या मागवण्यात आल्या होत्या त्यापैकी १०लाख रुपये किमतीच्या सळ्या चोरीला गेल्याचे शुक्रवारी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. अधिकाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली. समता नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना संशयित ट्रक कामाच्या ठिकाणाजवळ पार्क केलेला आढळला.
ट्रकच्या मालकाची माहिती तपासल्यानंतर त्यांना तो मालक भेटला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हा ट्रक दहिसर येथील अकबर मार्केट परिसरात राहणाऱ्या समिमुल्ला शेखला (३८) भाड्याने दिला होता. ट्रकमालकाने दिलेल्या वर्णनाच्या मदतीने काढलेले रेखाचित्र दाखवून पोलिसांनी स्थानिकांमार्फत आरोपींचा शोध घेतला आणि शोधून काढत त्याला दहिसर येथून अटक करण्यात आली.