भारत पेट्रोलियमच्या पाईपलाईनला भोक पाडून पेट्रोल चोरी करण्याचा प्रयत्न माहुल येथे समोर आला आहे. चोरट्यांनी या मार्गाने हजारो लिटर पेट्रोल चोरी केल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
( हेही वाचा : मांजरांच्या निर्बिजीकरणाचा खर्च दुप्पट: तीन वर्षांत ५४७० मांजरांची नसबंदी)
माहुल रिफायनरी प्लांटपासून वाडीबंदर प्लांटपर्यंत १२ किलोमीटरची १२ व्यासची पेट्रोलची पाईपलाईन गेली आहे. बीपीसीएल ऑईल कंपनीचे पाईप लाईनच्या सुरक्षा व सव्र्हेलन्सच्या कामकाजासाठी सन सिक्युरिटी या खाजगी कंपनीला कॉन्ट्रक्ट देण्यात आले आहे. या कंपनीचे सुरक्षा पर्यवेक्षक रोहित जगताप हे या पाईपलाईनची पाहणी करीत असताना माहुल पाईपलाईन येथील सपोर्ट पिलर ३७६ आणि ३७७ च्या दरम्यान बीपीसीएल पाईपलाईनला अज्ञात व्यक्तीकडून टॅपिंग(भोक) करण्यात आले असल्याचे दिसून आले.
रोहित जगताप यांनी याबाबत बीपीसीएल कंपनीचे व्यवस्थापक हर्शल भाजीपाले यांना कळविले, भाजीपाले यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासले असता अज्ञात व्यक्तीने पेट्रोल चोरी करण्याच्या हेतूने पाईपलाईनला भोक पाडून त्याला टॅपिंग करून त्यात लाकडी खुंटी मारून बंद करण्यात आले होते. या प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान चोरट्याकडून हजारो लिटर पेट्रोलची चोरी करण्यात आली असावी अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. बीपीसीएल कंपनीच्या मेंटनेस विभागाकडून पेट्रोल चोरीकरता करण्यात आलेले भोक बुजविण्यात आले असून उर्वरित पाईपलाईन तपासण्याचे काम सुरू आहे.
Join Our WhatsApp Community