रेल्वे रुळालगत मिळालेल्या एका अनोळखी मृतदेहाजवळ मुंबई पोलीस दलातील एका पोलीस कॉन्स्टेबलचे पाकीट मिळाल्यामुळे एकाच गोंधळ उडाला होता. मात्र, पोलीस कॉन्स्टेबल पोलीस ठाण्यात ड्युटीवर सुखरूप पोहचल्याचे कळताच नातेवाईक आणि मित्र-मंडळींचा जीव भांड्यात पडला. मात्र, मृतदेह नक्की कुणाचा आणि त्याच्याकडे पोलीस कॉन्स्टेबलचे पाकीट कसे काय आले या प्रश्नाचे उत्तर काही वेळाने रेल्वे पोलिसांना मिळाले. मृत व्यक्ती हा भुरटा चोर असून त्याने रेल्वे प्रवासादरम्यान कामावर निघालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे पाकीट मारून पळून जात असताना रेल्वे अपघातात त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ येथे घडला. कल्याण रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुख्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला असून मृताची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
अंबरनाथ रेल्वे रुळजवळ कल्याण रेल्वे पोलिसांना बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी मृतदेह मिळाला होता. सदर व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. मृतदेहापासून काही अंतरावर पोलिसांना एक चामडी पाकीट मिळाले. त्या पाकिटात एका पोलीस कॉन्स्टेबलचे गणवेशातील छायाचित्र आणि पॅन कार्ड मिळाले. या पाकिटात सापडलेल्या छायाचित्र आणि पॅनकार्ड वरून मृत इसम पोलीस कॉन्स्टेबल असल्याचा समज झाली. पाकिटात पोलीस ओखळपत्र अथवा राहण्याच्या ठिकाणचा पत्ता मिळून न आल्यामुळे कल्याण रेल्वे पोलिसांकडून मृतदेहाचा पत्ता आणि कुठल्या पोलीस ठाण्यात तैनात आहे याचा शोध सुरु असताना कोणीतरी व्हॉट्सअँप ग्रुपवर घटनास्थळी मिळालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे छायाचित्र आणि पॅनकार्ड व्हायरल करून अपघाताच्या ठिकाणी मिळाल्याची माहिती व्हायरल करण्यात आली.
काही वेळातच पोलीस कॉन्स्टेबलचे छायाचित्र व्हायरल होऊन नातेवाईक, मित्र-मंडळीपर्यंत पोहचले आणि एकच गोंधळ उडाला. मित्र-मंडळी आणि नातेवाईकांनी पोलीस कॉन्स्टेबल यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते सुखरूप पोलीस ठाण्यात पोहचले असल्याचे त्यांना कळले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. ज्यांचे छायाचित्र आणि पॅनकार्ड मिळाले ते पोलीस कॉन्स्टेबल मुंबई पोलीस दलात असून आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तैनात आहेत. अंबरनाथ येथे राहणारे पोलीस कॉन्स्टेबल बुधवारी सकाळी कामावर जाण्यासाठी घरातून निघाले आणि त्यांनी अंबरनाथ येथून मुंबई सीएसएमटी येथे जाणारी फास्ट ट्रेन पकडली. दरम्यान, ट्रेनमध्ये गर्दीतून चढताना पाठीमागून कोणीतरी त्यांच्या पॅन्टच्या खिशातून पाकिटाची चोरी केली. गर्दी असल्यामुळे आणि ट्रेन सुरु झाल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल यांना ट्रेनमधून उतरता आले नाही.
(हेही वाचा – Central Railway : दादर वरून सुटणाऱ्या २२ लोकल फेऱ्या होणार बंद , प्रवाशांना गाठावे लागणार परळ)
पाकिटात जास्त पैसे नव्हते किंवा महत्वाची कागदपत्रे नसल्यामुळे त्यांनी पुढच्या स्थानकावर उतरण्याचे टाळून थेट मुंबईतील त्याचे पोलीस ठाणे गाठले. या घटनेच्या तासाभराने कल्याण रेल्वे पोलिसांना अंबरनाथ रेल्वे रुळाजवळ मृतदेह आणि पाकीट मिळाल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला. परंतु, ही बाब पोलीस कॉन्स्टेबलच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ एक मेसेज तयार करून माझे पाकीट चोरीला गेले होते मी सुखरूप असल्याचा मेसेज मित्र-मंडळीला पाठवला. कल्याण रेल्वे पोलिसांनी पोलीस कॉन्स्टेबल यांना संपर्क करून झालेला प्रकाराबाबत माहिती घेतली व त्यांना कामावरून घरी जाण्यापूर्वी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात जबाब घेण्यासाठी बोलविण्यात आले असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली. तसेच रेल्वे रुळालगत मिळालेल्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याची माहिती ढगे यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community