सायबर गुन्हेगारी; फसवणूक टाळण्यासाठी सतर्कता बाळगा!

167

कोरोनाच्या काळापासून ऑनलाइन गुन्हे वाढले आहेत, कारण विद्यार्थी आणि अनेक ज्येष्ठ नागरीकही मोबाइलचा वापर करण्यास शिकले आहेत. मुले अभ्यास करता करता गेम, ऑनलाइन माहिती, सोशल मीडियावर जाऊन विविध विषयांची माहिती मिळवत असतात. सुरूवातीला मुलांवर मोठी माणसे लक्ष ठेवायची, पण नंतर ते शक्य होईनासे झाले. त्यामुळे मुले ऑनलाइन शॉपिंग किंवा डिजिटल पेमेंट करू लागली. इथूनच ऑनलाइन फसवणुकची शक्यता वाढली. ऑनलाइन शॉपिंग किवा संदेशाद्वारे अनेकदा लोकांची फसवणूक केली जाते. अशा गुन्ह्याला सायबर क्राइम म्हणतात. हे सर्व फार त्रासदायक आणि कधी कधी खर्चिकही असते. म्हणून सर्वांनी विषेशतः तरुणांनी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे, त्यामुळे पुढील नियम कटाक्षाने पाळल्यास धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

  • अनोळखी व्यक्तीचा संदेश वाचून उपयुक्त नसल्यास तो डिलीट करणे. तसेच कोणतीही लिंक असल्यास अजिबात उघडू नये.
  • अनोळखी फोन घेऊ नये.
  • कोणत्याही आलेल्या मेसेजवरून खरेदी करू नये. माहितीची साइट असल्यास ती कॉपी करून त्यातील डॉट कॉम किवा डॉट ओआरजी किवा डॉट इन नंतरची अक्षरे डिलीट करून आपल्या ब्राऊजवरून उघडावी.
  • बँक, प्रवासी कंपनी, खरेदी कंपनी, वीज/टेलिफोन/गॅस वगैरे कंपनींची अधिकृत वेबसाइट उघडावी.
  • आई, वडील, भाऊ, बहिण किंवा इतर कोणाचा व्यवहार आपण त्यांच्या परवानगी शिवाय करणे हा गुन्हा आहे.
  • आपण आजच्या दिवसात ब्राऊज केलेल्या साईट्स किंवा इतर कुकीज वेब ब्राऊजमध्ये जाऊन डिलीट करणे. क्रोम उघडल्यास वर उजव्या बाजूस तीन उभे बिंदू दिसतात, तिथे क्लिक केल्यास हिस्ट्री दिसते. ती हिस्ट्री तशीच रहाणे घातक ठरू शकते. दररोज ती डिलीट करत जाणे.
  • आपला इ-मेल जेव्हा वापरत नसू तेव्हा लॉग ऑफ करावा. कारण यात आपण कुठे काय करतो, याची इत्यंभूत माहिती जाते.
  • एखादी चूक घडून कोणाकडून ब्लॅक मेलिंग होत असल्यास आपल्या जवळच्या मोठ्या व्यक्तीस माहिती देणे. लाजेखातर लपवू नये. हे फार महागात पडू शकते.
  • अनेक गेम्स तरुणांना गुन्हा करण्यास प्रवृत्त करतात. ते गेम्स खेळू नये. त्या गेम्समुळे घरातील सर्वांचे आयुष्य वेठीस धरले जाते. माहिती लीक होते.
  • आपले पासवर्ड मोबाइलमध्ये जतन करू नये. ते लिहूनही मोबाइलमध्ये ठेवू नये. ब्लॅक हॅकर्स क्षणात ते मिळवतात.
  • आपले पासवर्ड फार किचकट ठेवावेत. माझा मित्र (ddmmyy)२ + त्याची जन्मतारीख असे ठेवायचा. किवा माझी पहिली शाळा व गाव असा ParleTilaKVP@78. पार्ले टिळक विलेपार्ले ७८ (SSC ZALO). जतन करताना FirstSclSub@Yr असे ठेवल्यास पासवर्ड फोडणे कठिण असते.
  • आर्थिक परिस्थिती चांगली असल्यास किवा दोन फोन असल्यास, एका फोन वरून सोशियल मीडिया, फोन करणे व दुसऱ्यावरून फक्त बँकिंग किंवा ऑनलाइन व्यवहार करणे. बँकिंगवर फोन आल्यास कोणाचाही न घेणे व बंद करून गरज असल्यास दुसऱ्या फोनवरून फोन करणे.
  • आई-वडिलांनी मुलांना स्वत:ची बँकिंग वा आर्थिक माहिती न देणे. त्यांच्या नेटवरील प्रत्येक कृत्याची नोेंद करा. त्यांना ऑनलाइन खरेदी किवा पेमेंट करू देऊ नये. आपले पासवर्ड बदलत रहाणे.
  • दररोज शक्य झाल्यास मुलांचे मोबाइल पाहून, युआरएल लिंक्स डिलीट करणे. गेमिंग साईट डाउनलोड न करणे.

(हेही वाचा ‘वन-डे’मध्ये विराटच बेस्ट; विश्वविक्रमापासून तीन शतके दूर)

मुलांना मोहात पाडणारे खूप जण असतात. वेगवेगळ्या मार्गाने त्यांना जाळ्यात ओढतात. इथिकल हॅकिंगच्या नावाखाली ब्लॅक हॅकर्स त्यांना नेस्तनाबूत करण्याच्या नावाखाली हॅकर्स शिकवतात आणि हळूहळू मुले वाईट मार्गाला जातात. आई-वडिलांना सांगतात मी ब्लॅक हॅकर्सना पकडणाऱ्या पोलिसांबरोबर काम करतो. पण खरे तर एकदिवस सर्वप्रथम आई वडिलांचे अकाउंट हॅक करून पहिला धडा ते आई वडिलांना फसवून त्यांचे अकाऊंट साफ करतात. लहान मुलांच्या प्रोनोग्राफीमध्ये सुध्दा ते नाईलाजाने खेचले जातात.

तसेच यदाकदाचित बँकेच्या व्यवहारामुळे पैसे गेले असल्यास आधी राष्ट्रीय सायबर क्राईमच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तक्रार करा. ही वेबसाइट हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत उपलब्ध आहे. या वेबसाईटवर जाण्यासाठी सायबरक्राइम डॉट जीओव्ही डॉट इन (cybercrime.gov.in)वर क्लिक करा. येथे वेबसाइटमध्ये सायबर क्राइम रिलेटेड महिला-लहान मुले असे सायबर क्राइमचे दोन भाग केलेले असतात. युजर्सला कशात तक्रार करायची आहे त्यावर क्लिक करावे. सायबर क्राइम अंतर्गत धोका, फिशिंग, हॅकिंग आणि फ्रॉड यासारखे मुद्दे येतात. यावर क्लिक केल्यानंतर फोन नंबर, नावासह सर्व माहिती विचारली जाते. कशी आणि काय फसवणूक आणि कोणी फसवणूक केली, याची माहिती मागितली जाते. तुम्हाला एक नंबर दिला जातो. या नंबरवरून तुम्हाला वरील वेबसाईटवरून आपल्या तक्रारीचा मागोवा आणि माहिती घेता येते. माहिती गुप्त असते.

समजा कोणीतरी पैसे ऑनलाईन क्राईमद्वारे लुबाडले असतील, तर प्रथम तुमच्या बँकमध्ये फोन करावा. तेथे माहिती द्यावी. टाळाटाळ झाल्यास वरिष्ठांशी बोलावे, पण बँकमध्ये प्रथम तक्रार नोंदली गेल्यास पुढचे काम सोपे होते. नंतर पोलीस तक्रार करून एफआयआर क्रमांक घ्यावा. ती तक्रार बँकमध्ये सादर करावी. तीन दिवसाच्या आत जर हे घडले तर पैसे परत मिळतात, ते बरेच सोपे असते. प्रत्येक गेलेल्या पैशाचा विमा असतो. काही दिवसात ते पैसे तुमच्या खात्यात जमा होतील पण चौकशी पूर्ण होईपर्यंत ते काढता येत नाहीत. चौकशीला जास्तीत जास्त ६० दिवस जातात. ६० दिवसानंतर आरबीआय ही तक्रार निकाली काढते. म्हणून ६० दिवसांनंतर तक्रार करतांना फार कठिण जाते.

मुलांनो, तुमच्या माध्यमातून तुमच्या आई-वडिलांना लुबाडले जाऊ शकते, त्यांना ब्लॅकमेल केले जाऊ शकते, तसेच तुम्हाला वाईट मार्गाला लावून त्यांना आयुष्यातून उठवले जाऊ शकते. म्हणून सावधान. तसेच पालकांनो, तुम्हीही सावध रहा. मुलांमध्ये काही वेगळेपणा जाणवू लागला, तर सावध व्हा. छडा लावा. न चिडता त्यांना विश्वासात घ्या. त्यांचे भवितव्य तुमच्याच हातात आहे.

लेखक – सुहास नार्वेकर, आंतरराष्ट्रीय संगणक तज्ज्ञ आणि माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य संगणक सल्लागार

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.