…म्हणून त्याने अंबानींच्या शाळेत बॉम्ब असल्याची दिली धमकी

प्रसिद्धी मिळविण्यासाठी त्याने चक्क बीकेसी येथे असणाऱ्या धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी देऊन खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर स्वतःच दुसरा कॉल करून त्याने हे सर्व स्वतःला प्रसिद्धी मिळावी यासाठी केल्याची कबुली दिल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या कॉलमुळे मात्र सुरक्षा यंत्रणा आणि शाळा प्रशासनाची काही वेळाकरता अक्षरशः तारांबळ उडाली होती. याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अज्ञात कॉलरने सोमवारी दुपारी धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल शाळेच्या लँडलाइन नंबरवर कॉल करून, शाळेत टाइम बॉम्ब पेरल्याचे सांगितले आणि कॉल कट केला. या घटनेची माहिती बीकेसी पोलिसांना देण्यात आली, त्यानंतर  बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाने (बीडीडीएस) घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण शाळेची तपासणी केली, परंतु पोलिसांना शाळेत काहीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. धमकीच्या या कॉलमुळे  शाळेत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
 
 
शाळेने केलेल्या तक्रारीनुसार,अज्ञात कॉलरने काही तासांनी दुसरा कॉल शाळेच्या गेटवर केला. तिथे त्याने दावा केला की त्याचे नाव विक्रम सिंह असून तो गुजरातचा रहिवासी आहे. तसेच त्याने हा धमकीचा कॉल प्रसिद्धी मिळविण्यासाठी केला होता. धमकीच्या कॉलमुळे पोलीस त्याला पकडतील आणि त्याचे फोटो आणि नाव प्रसारमाध्यमांमध्ये छापून येईल आणि संपूर्ण देशात त्याचे नाव होईल म्हणून त्याने हा कॉल केल्याचे सांगितले.  शाळेला खरे पटावे म्हणून त्याने स्वतःचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड शाळेला शेअर केले अशी माहिती सूत्रांनी दिली.
बीकेसी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याच्या पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक गुजरातमध्ये रवाना झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here