- प्रतिनिधी
झटपट पैसा कमविण्याच्या नादात सव्वा लाख गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या टोरेस (Torres) या विदेशी कंपनीने सर्व खापर संचालक, सीईओ आणि सीए या भारतीयांवर फोडले आहे. एवढे सर्व घडून देखील टोरेस कंपनीकडून गुंतवणूकदारांची अजून देखील दिशाभूल करण्याचा प्रकार समोर आला आहे.या कंपनीकडून गुंतवणूकदारांना मेसेज पाठवून ‘काळजी करू नका,आशा सोडू नका,तुमच्या सर्वांसाठी आणि टोरेस टीमसाठी ही कठीण वेळ आहे, तुमची सर्व खाती सक्रिय केली जातील’ असे मेसेज पाठवले जात असून गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे.
टोरेस (Torres) ब्रँड चालविणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रा. लि. ही विदेशी कंपनीने फेब्रुवारी २०२४ मध्ये भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पाऊल टाकले. दादर सारख्या ठिकाणी या कंपनीने ‘टोरेस ज्वेलरी’ नावाची कंपनी उघडली होती. कंपनीचे संचालक सर्वेश अशोक सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्को, सीईओ तौफिक रियाझ उर्फ जॉन कारटर तसेच कंपनीच्या जनरल मॅनेजर तानिया कॅसातोवा आणि कंपनीची स्टोअर इंजार्च व्हॅलेंटीना कुमार आणि सीए म्हणून अभिषेक गुप्ता यांना दाखविण्यात आले.
काय होती स्कीम?
टोरेस (Torres) कंपनीने ज्वेलरी आणि मोजोनाईट खडे (हिरे) खरेदी करणाऱ्यासाठी खरेदीच्या रकमेवर प्रत्येक आठवडा ६ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवले. म्हणजे तुम्ही १० हजाराची गुंतवणूक केल्यास तुम्हाला त्या किमतीत हिरेजडित अंगठी किंवा मोजोनाईट खडा देऊन त्याची रीतसर पावती दिली जाते, त्यानंतर तुमचे डिजीटल खाते बनवून तुम्हाल ग्राहक क्रमांक देण्यात येतो, डिजीटल खात्यात तुमची संपूर्ण माहिती बँक डिटेल्स टाकली जाते, त्यानंतर तुम्हाला तुमचा ग्राहक ओळख क्रमांक देण्यात येतो. ५२ आठवडे तुमच्या बँक खात्यात गुंतवणूक केलेल्या रकमेवर ६ टक्के परतावा देण्याचे आमिष कंपनीकडून दाखवले गेले, म्हणजे तुम्ही १० हजार गुंतवणूक केली असल्यास तुम्हाला ६ टक्के म्हणजे प्रत्येक आठवड्याला ६०० रुपये तुमच्या खात्यात पाठवले जातील, असे एकूण ५२ तुम्हाला परतावा देण्यात येईल. तुम्ही खरेदी केलेली ज्वेलरी किंवा हिऱ्याच्या किंमतीवर तुम्हाला प्रत्येक आठवड्याला व्याज दिले जातील म्हणजेच ५२ आठवड्यात तुमच्या खात्यावर तुम्ही गुंतवणूक केलेल्या रकमेवर तीन पटीने पैसे जमा होणार असा या स्कीमचा भाग होता.
मराठी माणसाला बनवले संचालक म्हणून…
टोरेस या विदेशी कंपनीने सर्वेश अशोक सुर्वे या मराठी माणसाला या कंपनीच्या संचालक पदावर ठेवले होते. टोरेस कंपनीचे संस्थापक जॉन कार्टर आणि व्हिक्टोरिया कोवालेन्सी हे दोघे आहेत. हे दोघे युक्रेन देशाचे नागरिक असून तानीया कॅसोतोवा ही उझबेकिस्तान या देशाची नागरिक असून ती टोरेस कंपनीची स्टोर्स मॅनेजर म्हणून काम पहात होती, तसेच व्हॅलेंटिना कुमार ही रशियन असून तीने एका भारतीय नागरिकासोबत विवाह केला आहे आणि तौफिक रियाज हा भारतीय नागरिक कंपनीचा सीईओ होता. सर्वेश सुर्वे हा मुंबईत राहणारा असून आधार कार्ड बनवून देण्याचे काम करीत होता, टोरेस कंपनीने सुर्वेला या कंपनीचा संचालक बनवून प्रत्येक ठिकाणी त्याची डिजीटल स्वाक्षरी घेण्यात येत होती. या कंपनीचे संस्थापक यांनी स्वतःला सुरक्षित ठेवून मराठी व्यक्ती सुर्वे आणि भारतीय व्यक्ती तौफिक रियाज यांना स्वाक्षरी करण्याचे अधिकार देण्यात आले होते. (Torres)
५२ आठवड्यापूर्वीच कंपनीचा हप्ता बंद…
फेब्रुवारी २०२४ मध्ये टोरेस (Torres) ज्वेलरीचे मुंबईतील दादर येथे मुख्य कार्यालय आणि शो रूम उघडले होते, या पाठोपाठ नवी मुंबईतील सानपाडा, कल्याण, बोरिवली आणि मीरारोड येथे या कंपनीच्या शाखा उघडण्यात आलेल्या होत्या. पुढच्या महिन्यात या कंपनीला एक वर्ष पूर्ण होणार होते. मात्र ५२ आठवडे पूर्ण होण्यापूर्वीच या कंपनीने डिसेंबर महिन्यात आपला गाशा गुंडाळणे सुरू केले होते व डिसेंबर २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात कंपनीने गुंतवणूकदारांचे हप्ते बंद केले, काही गुंतवणूकदारांनी हप्ता न आल्यामुळे दादर येथे कंपनीकडे चौकशी केली असता बँकेत टेक्निकल प्रॉब्लेम झाला असून पुढच्या आठवड्यात दोन्ही हप्ते एकत्र येतील असे सांगण्यात आले. १ जानेवारी ते ६ जानेवारी २०२५ दरम्यान टोरेस या कंपनीने इतर ठिकाणचे शो रूम बंद केले आणि शेवटी दादर येथील टोरेसचे मुख्य कार्यालय बंद करण्यासाठी सकाळीच ६ वाजता पोहचलेल्या तानीया कॅसोतोवा आणि इतर कर्मचारी यांना गुंतवणूकदारांनी घेराव घातला. शिवाजी पार्क पोलीस तातडीने त्या ठिकाणी दाखल झाली आणि तानिया, व्हलेटिना यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी शो रूम बंद करून तेथे पहारा ठेवण्यात आला. (Torres)
फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना पोलीस ठाण्यात बोलावून त्याची रीतसर तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी कंपनीचे संचालक सर्वेश अशोक सुर्वे यांच्यासह पाच जणांविरुद्ध फसवणूक, तसेच महाराष्ट्र ठेवीदाराच्या हितसंबधाचे संरक्षण अधिनियम कायदा (एम.पी.आय.डी.ॲक्ट) कलम ३,४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी पोलिसांनी तानिया, व्हलेटिना आणि सर्वेश सुर्वे यांना या प्रकरणात अटक दाखविण्यात आली असून त्यांना सायंकाळी सत्र न्यायालयात करण्यात आले. जॉन कार्टर आणि व्हिक्टोरिया कोवालेन्सी हे दोघे युक्रेनमध्ये अगोदरच पळून गेले होते पोलिसांनी या दोघांविरुद्ध एलओसी जारी करण्यात आली असून या गुन्हयातील इतर आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार शिवाजी पार्क, नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाणे, मीरा रोड येथील पोलीस ठाण्यात सोमवार पासून गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल करण्यासाठी रीघ लागली होती. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात जवळपास एक हजार पेक्षा अधिक लोकांनी आपल्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात नोंदविल्या आहेत. गुंतवणूक दारांचा आकडा जवळपास १ लाख २५ हजाराच्या घरात असल्याचे टोरेस कंपनीने दिलेल्या आय डी क्रमांकाचा शेवटचा आयडी क्रमांकावरून समोर येत आहे. तसेच गुंतवणुकीची हजार कोटींच्या घरात जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (Torres)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community