बहुचर्चित टोरेस (Torres Scam) ज्वेलर्सची पालक कंपनी असलेल्या प्लॅटिनम हर्नचा मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ तौसिफ रियाझवर आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी, त्याने स्वतःला निर्दोष घोषित करत, आपणच या प्रकरणाला वाचा फोडल्याचा दावा केला होता. मात्र पोलिसांनी त्याला लोणावळ्यातून अटक केली आहे. तौसिफला ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा तौसीफची कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. एक भारतीय आणि सात युक्रेनचे नागरिक असे आठ आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
सुमारे तीन लाख मुंबईकरांना तब्बल १० हजार कोटींचा गंडा घालणाऱ्या तौसिफ रियाझ टोरेस (Torres Scam) हा कंपनीचा सीईओ देखील आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यापासून तो फरार होता. तौसीफ लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये लपून बसला होता. त्याचा ठावठिकाणा समजताच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने धाड टाकली आणि तेथून अटक केली.
(हेही वाचा Bangladesh च्या युनूस सरकारला डोनाल्ड ट्रम्पकडून धक्का )
तौसिफने दावा केला की, जेव्हा त्याला या घोटाळ्याची माहिती मिळाली तेव्हा त्याने ही बाब केंद्रीय संस्थांच्या निदर्शनास आणून दिली. त्याने असा दावा केला होता की, तो आरोपींसोबत नव्हता तर त्यांच्या विरोधात होता. तौसिफचे बिहारशी संबंध असल्याचेही तपासात समोर आले आहे. तो भागलपूरमधील सुलतानगंजचा रहिवासी आहे. आर्थिक गुन्हे शाखेने त्याला अटक करण्यासाठी सुलतानगंजमध्येही छापा टाकला होता. त्याच्याविरुद्ध लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. याशिवाय, पोलिसांनी भागलपूर शहरातील त्याच्या नातेवाईकांच्या घरांवर आणि सुलतानगंजमधील तौसिफच्या वडिलोपार्जित घरावरही छापे टाकले.
तपासादरम्यान, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कुलाबा येथील एका फ्लॅटमधून पाच कोटी रुपये जप्त केले होते. या कंपनीने हजारो गुंतवणूकदारांना मौल्यवान दगड देण्याचे आश्वासन देऊन फसवले होते, परंतु त्यांना फक्त ३०० रुपयांचे स्वस्त दगड दिले होते. तसेच कंपनीने गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याचे आश्वासनही दिले होते. या प्रकरणात तीन जणांना आधीच अटक करण्यात आली असून दोन परदेशी नागरिक फरार आहेत. टोरेस घोटाळ्यातील (Torres Scam) आरोपींनी मुंबई तसेच शेजारच्या नवी मुंबई, मीरा भाईंदर येथील शेकडो गुंतवणूकदारांना त्यांच्या योजनेचे बळी बनवले होते, असे सांगितले जात आहे.