Torres Scam : टोरेस कंपनीला ६ महिन्यापूर्वीच बजावलेले समन्स; कारवाई मात्र झाली नाही

130
Torres Scam : टोरेस कंपनीला ६ महिन्यापूर्वीच बजावलेले समन्स; कारवाई मात्र झाली नाही
  • प्रतिनिधी 
सरकारी यंत्रणेच्या नाकाखाली टोरेसने जवळपास १ हजार कोटींचा घोटाळा केला. सरकारी यंत्रणेला हा प्रकार लक्षात येऊन देखील त्यांनी केवळ टोरेस कंपनीला समन्स पाठवले त्यानंतर कुठलीही कारवाई केली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक विदेशी कंपनी मुंबईसारख्या शहरात केवळ अकरा महिन्यांत हजारो कोटी रुपये लुटून पसार होईपर्यंत सरकारी यंत्रणांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे या घोटाळ्याला सरकारी यंत्रणा तेवढीच जबाबदार असल्याचा सूर सर्वसामान्यांमध्ये उमटत आहे. (Torres Scam)
शिवाजी पार्क पोलीस ठाणे, आर्थिक गुप्तवार्ता पथक नवी मुंबई आणि आयकर विभागाने जून, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२४ या महिन्यांत टोरेस कंपनीला समन्स पाठवून चौकशीला बोलावले होते. या चौकशीचे पुढे काय झाले याबद्दल या सरकारी यंत्रणेकडे कुठलेच उत्तर नसल्यामुळे या घोटाळ्याचा प्रकार या सरकारी यंत्रणेच्या डोळ्यांदेखत सुरु असतांना सरकारी यंत्रणा डोळ्यांवर पट्टी बांधून बसली होती का? असा सवाल देखील या घोटाळ्यात फसलेल्या गुंतवणूकदारांकडून विचारला जात आहे. (Torres Scam)
टोरेस ही कंपनी विदेशी असून या कंपनीने फेब्रुवारी २०२३ मध्ये मुंबईत पाय रोवले. मुंबईतील दादर, नवी मुंबई, सानपाडा, मिरारोड, कल्याण, कांदिवली आणि गिरगाव या ठिकाणी त्यांनी टोरेस प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड नावाने शोरूम उघडले होते. दागिने आणि ‘मोजॉईनाईट’ डायमंडच्या नावाखाली या कंपनीने गुंतवणूकदारांना प्रत्येक आठवड्याला ७ टक्के परतावा असे ५२ आठवडे देण्याचे अमिष दाखवून, त्याचबरोबर मोटार कार, घरे, मोबाईल फोन या बक्षिसांचे अमिष दाखवून जवळपास १ लाख २५ हजार गुंतवणूकदारांना १ हजार कोटींचा गंडा घालून ही कंपनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच रफुचक्कर झाली. कारवाईच्या नावाखाली शिवाजी पार्क पोलिसांनी ६ जानेवारी २०२५ रोजी टोरेस कंपनी, संचालकासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून शिवाजी पार्कच्या स्टोर्समध्ये पहाटेच्या सुमारास गाशा गुंडाळण्यासाठी आलेल्या संचालक सर्वेश सुर्वे, स्टोर्स मॅनेजरसह तिघांना अटक केली आहे. तर या कंपनीचे मुख्य संस्थापक हे विदेशी असून आणि दोघे युक्रेन येथे पळून गेल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पोलिसांनी या दोघांविरुद्ध लुकआउट नोटीस (एलओसी) जारी केली आहे. हे प्रकरण मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. (Torres Scam)
टोरेसच्या हजारो कोटींच्या या घोटाळा प्रकरणात शिवाजी पार्क पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी रियाज आणि अभिषेक गुप्ता यांनी वकिलामार्फत असा दावा केला आहे की, आम्ही पोलिसांना कंपनीच्या घोटाळ्याबाबत पूर्वीच कल्पना दिली होती. टोरेस कंपनीचा मुख्य लेखापाल जो पोलिसांच्या यादीत संशयित आरोपी अभिषेक गुप्ता यांनी वकिलामार्फत असा दावा केला आहे की, मुंबई पोलिस आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सह अनेक प्राधिकरणांकडे आपण तक्रारी केल्या होत्या, त्यात दागिन्यांच्या साखळीद्वारे फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुप्ता यांनी असा आरोप केला आहे की, तक्रारी करूनही कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य वेळी पाऊले उचलली गेली नाही. (Torres Scam)
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गुप्ता यांनी ३० डिसेंबर रोजी प्रथम आपल्या तक्रारी सादर केल्या आणि कथित फसवणुकीचा तपशील देण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. त्याच्या प्रयत्नानंतरही, कंपनीच्या सानपाडा येथील शोरूम येथे नवी मुंबई पोलिसांनी नियोजित छापा टाकण्यापूर्वी मुख्य आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. गुप्ता यांनी दावा केला आहे की, त्यानंतर मला धमकीचे फोन येत आहे. बुधवारी शिवाजी पार्क पोलिस ठाण्याकडे त्याने स्वतःसाठी संरक्षण मागितले आहे. एक हजार कोटी रुपयांच्या कथित टोरेस घोटाळ्यातील वॉन्टेड आरोपी आणि कंपनीचा माजी सीईओ तौसिफ रियाझ हा व्हिसलब्लोअर असल्याचा दावा करतो. त्याने असे प्रतिपादन केले की, त्याने ४ जानेवारी रोजी संबंधित एजन्सींना सावध केले होते, सविस्तर कागदपत्रे आणि पुरावे सादर केले होते ज्यात चालू फसवणूक उघडकीस आली होती.  (Torres Scam)
दरम्यान, शिवाजी पार्क पोलिसांनी टोरेस या कंपनीच्या व्यवस्थापकाला २९ जून २०२४ रोजी समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर तसेच नवी मुंबई आर्थिक गुप्तवार्ता पथकाने २४ ऑक्टोबर २०२४ रोजी सानपाडा येथील टोरेस ज्वेलरी शॉपला समन्स बजावले होते व कागदपत्रे चौकशीकामी हजर राहण्यास सांगितले होते. आयकर विभागाने १४ नोव्हेंबर २०२४ रोजी प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड, ऑपेरा हाऊस, गिरगाव यांना समन्स पाठवले होते. सरकारी यंत्रणांनी समन्स पाठविल्यानंतर टोरेसचे व्यवस्थापक, कार्यकारी अधिकारी या यंत्रणेच्या चौकशीला सामोरे गेले होते का? जर गेले असतील तर चौकशीत लोकांची फसवणूक होत आहे हे यंत्रणेच्या लक्षात कसे आले नाही, सरकारी यंत्रणेने याबाबत काय कारवाई केली याबाबत या सरकारी यंत्रणांकडून कुठलेही उत्तरे देण्यात आलेले नाही. पोलीस, आयकर विभाग यांच्या काही महिन्यांपूर्वीच हा प्रकार लक्षात आला होता, मग त्यांनी काय कारवाई केली याबाबत काहीही कळू शकलेले नाही. सरकारी यंत्रणांनी वेळीच कारवाई केली असती तर आज हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये वाचले असते असा आरोप गुंतवणूकदारांकडून केला जात आहे. (Torres Scam)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.