मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये गाणी गाऊन भीक (Train Beggar) मागणाऱ्या एका तरुणाला रेल्वे पोलिसांनी मोबाईल चोरी प्रकरणी अटक केली आहे. लोकल ट्रेन मध्ये गाणी गात गात प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या या भिकाऱ्यावर मोबाईल चोरीचे २५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
शब्बीर अमिरजान शेख (३२) असे अटक करण्यात आलेल्या गायकाचे नाव आहे. शब्बीर हा ट्रेनमध्ये गाणे गाऊन भीक मागतो. वांद्रे रेल्वे पोलिसांनी शब्बीरला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. चौकशीत त्याच्यावर मुंबईतील रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये जवळपास २५ मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
नालासोपारा मध्ये राहणारा शब्बीर हा दिवसा ट्रेनमध्ये गाणे गाऊन भीक मागत असे व सायंकाळी ६ ते ८ या गर्दीच्या वेळी दोन तास प्रवाशांचे मोबाईल फोन चोरी करीत होता. पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार ते चर्चगेट तर कधी मध्य रेल्वेच्या दादर ते ठाणे कुर्ला ते मानखुर्द या दरम्यान तो लोकल ट्रेन मध्ये दिवसा गाणे गाऊन पैसे मिळवत होता, गर्दीच्या वेळी मात्र त्याचे तोंड बंद होऊन हातचलाखी सुरू होत असे अशी माहिती एका रेल्वे पोलीस अधिकारी यांनी दिली. शब्बीर याची मोडस ऑपरेंडी अशी होती की, गाणी गाताना ट्रेनमध्ये घुसणे आणि भीक मागणे (Train Beggar) आणि संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत गर्दीत फोन चोरणे ही पद्धत वापरून तो प्रवाशांचे मोबाईल फोन लांबवत होता. शब्बीर याच्याविरुद्ध वडाळा, दादर, वसई, बोरिवली, कुर्ला, अंधेरी आणि वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात २५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधिकारी यांनी दिली.
(हेही वाचा-Ind vs SA 2nd T20 : भारत वि. द. आफ्रिका दुसऱ्या टी-२० सामन्यावरही पावसाचं सावट)
१८ नोव्हेंबर रोजी शब्बीर याने दादर स्थानकावरून विरार ट्रेनमध्ये प्रवेश केला आणि एका विद्यार्थ्याचा आयफोन चोरून गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला होता. या प्रकरणी वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दादर रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता शब्बीर शेख कॅमेरात कैद झाला होता. वांद्रे रेल्वे पोलिसांच्या गुन्हा प्रकटीकरण पथकाने त्याचा शोध घेऊन ९ डिसेंबर रोजी त्याला दादर रेल्वे स्थानकतून अटक केली.
यापूर्वी शब्बीर याला वडाळा रेल्वे पोलिसांनी पाच वेळा, दादर रेल्वे पोलिसांनी पाच वेळा, वसई रेल्वे पोलिसांनी चार वेळा, अंधेरी रेल्वे पोलिसांनी तीनवेळा, कुर्ला रेल्वे पोलिसांनी दोनदा आणि बोरिवली आणि वांद्रे रेल्वे पोलिसांनी प्रत्येकी एकदा अटक केली आहे.
Join Our WhatsApp Community