26 जानेवारी 2010 रोजी अल्पेश धोत्रे याचा पश्चिम रेल्वेतून प्रवास करताना पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी अल्पेश याचे वडील अरुण धोत्रे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी सुनावणी करताना ‘अल्पेशचा मृत्यू रेल्वे अपघातात झाला. जो रेल्वे कायद्याच्या कलम 123 नुसार अनुचित घटनेच्या कक्षेत येतो. त्यामुळे अपीलकर्ता नुकसान भरपाईसाठी पात्र आहे’, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मुंबई लोकलमधून पडून मृत्यूमुखी पडणाच्या घटना दररोज समोर येत असतात. या घटनेत तरुणाच्या घरच्यांना 8 लाखांची भरपाई मिळणार आहे; पण ही भरपाई तब्बल 13 वर्षांनंतर मिळणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पश्चिम रेल्वेला यासंदर्भातील आदेश दिला आहे.
(हेही वाचा – Sudhir More : शिवसेना माजी नगरसेवक सुधीर मोरे आत्महत्या प्रकरण; संशयित आरोपीची अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव)
धोत्रे यांचा मुलगा मित्रांसोबत भाईंदर ते वसई दरम्यान रेल्वेने जात होता. नायगाव ते वसई स्थानकादरम्यान गाडी येताच डब्यात प्रचंड गर्दी झाल्याने तो खाली पडला आणि त्यातच त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. तो 20 वर्षांचा होता. दरम्यान 13 वर्षांनी याप्रकरणाचा निकाल आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना ६ आठवड्यांच्या आत भरपाईची रक्कम जमा करण्यास सांगितले आहे. ही रक्कम तरुणाचे वडील अरुण धोत्रे यांना देण्यात येणार आहे.
वडिलांचा नुकसानभरपाईसाठी दावा
आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर धोत्रे यांनी रेल्वे दावा न्यायाधिकरणाकडे मुंबई खंडपीठाकडे नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला होता. ट्रिब्युनलने 21 एप्रिल 2014 रोजी धोत्रे यांचा अर्ज फेटाळला होता. आपल्या मुलाचा मृत्यू अपघाती असल्याचे सिद्ध करण्यात धोत्रे अपयशी ठरल्याचे न्यायाधिकरणाने म्हटले होते. दरम्यान अरुण धोत्रे हे त्या वेळी मुलावर अवलंबून होते. न्यायाधिकरणाच्या आदेशावर असमाधानी असलेल्या धोत्रे यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. मुलगा अल्पेशचा मृत्यू हा निष्काळजीपणामुळे झाल्याचा दावा वडिल अरुण धोत्रे यांनी केला होता; पण तो रेल्वे कायद्याच्या कलमांतर्गत अपघाताच्या व्याख्येत येत नाही, असे रेल्वेच्या वकिलांचे म्हणणे होते. प्रवासी खचाखच भरलेल्या ट्रेनच्या फूटबोर्डवर उभे राहिल्याने त्याला बेफिकीर म्हणता येईल का ? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. गर्दीच्या वेळी लोक ऑफिस, घर आणि कॉलेजला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. रेल्वेच्या वकिलाच्या युक्तिवादावर न्यायालयाने ही टिप्पणी केली.
‘२६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन होता. त्यामुळे लोकल ट्रेनमध्ये गर्दी नव्हती. अशा परिस्थितीत गर्दीच्या लोकल ट्रेनमध्ये चढण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे गर्दीमुळे तरुणाचा मृत्यू झाला, असे म्हणता येणार नाही’, असे न्यायालयाने म्हटले. असे असले तरी अल्पेशचा मृत्यू रेल्वे अपघातात झाला. जो रेल्वे कायद्याच्या कलम 123 नुसार अनुचित घटनेच्या कक्षेत येतो. त्यामुळे अपीलकर्ता नुकसान भरपाईसाठी पात्र आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community