Robbery : सायनमध्ये २ कोटींचा दरोडा; दिल्ली क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचे सांगून लुटले

अपहरणकर्त्यांनी हरिराम याला मारहाण करून त्याच्याजवळील सर्व दागिने आणि सोन्याचे बिस्कीट बळजबरीने घेऊन त्याला तेथेच सोडून पळून गेले.

146

मुंबईत सोन्याचे दागिने घडविण्यासाठी आलेल्या हैद्राबाद येथील इंडिया मार्ट ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्याचे सायन येथून अपहरण करून भिवंडी येथे आणून त्याच्याजवळील दोन कोटी रुपये किमतीचे सोनं लुटण्यात आल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. अपहरणकर्त्यांनी दिल्ली क्राईम ब्रँच पोलीस असल्याचे सांगून अपहरण केल्याची माहिती या कर्मचाऱ्याने सायन पोलिसांना दिली. याप्रकरणी सायन पोलिसांनी अपहरण आणि दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरोडेखोरांच्या शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हरीराम धनाराम घोटिया असे लुटण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे, तो गिरीराज कॉम्प्लेक्स निळकंठ ऑप्टिकल्स जवळ कुट्टी हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी राहण्यास आहे. हैदराबाद येथे इंडिया मार्ट ज्वेलर्सच्या दुकानात काम करणारा हरिराम याला त्याचा मालक संतोष नरडी यांनी दोन किलो वजनाचे सोन्याचे २० बिस्कीट तसेच काही हिरेजडित दागिने पॉलिश करण्यासाठी मुंबईतील झवेरी बाजार आणि बीकेसी येथे सोन्याचे दागिने बनविण्यासाठी पाठवले होते. सुमारे दोन कोटी रुपयांचे सोनं आणि दागिने घेऊन हरिराम हा गुरुवारी सकाळी ऑरेंज टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या बसमधून सायन पूर्व द्रुतगती महामार्ग येथील हायवे अपार्टमेंट येथे उतरला, दरम्यान त्याच्या पाठोपाठ पांढऱ्या रंगाच्या इनोवा मोटार हरिरामच्या पुढ्यात येऊन उभी राहिली, मोटारीतून चार इसम बाहेर आले व त्यांनी ते दिल्ली क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याचे सांगून त्याला पोलीस ओळखपत्र दाखविले व बळजबरीने मोटारीत बसवून मोटार ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे घेऊन आले.

(हेही वाचा BMC : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी करा – अमित साटम) 

अपहरणकर्त्यांनी हरिराम याला मारहाण करून त्याच्याजवळील सर्व दागिने आणि सोन्याचे बिस्कीट बळजबरीने घेऊन त्याला तेथेच सोडून पळून गेले. या प्रकारामुळे घाबरलेल्या हरिराम याने मालकाला फोन करून झालेला सर्व प्रकार मालकाला सांगितला, मालकाने त्याला तात्काळ सायन पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पाठवले. सायन पोलिसांनी हरिराम याच्या तक्रारीवरून पाच ते सहा अनोळखी लुटारू विरुद्ध अपहरण, दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार करून आरोपीच्या मागावर पाठवले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.