दोन डॉक्टरांना मारहाण करून दंड म्हणून पैसे उकळल्या प्रकरणी दोन अधिकाऱ्यांसह तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. ही घटना समता नगर पोलीस ठाण्यातली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून या दोन डॉक्टर्सना पोलीसांनी ताब्यात घेतले. पुढे त्यांना मारहाण करण्यात आली आणि तीन तास पोलीस ठाण्यात उभे करून ठेवण्यात आले. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलिस निरीक्षक प्रकाश वसंत पवार, उपनिरीक्षक प्रफुल्ल भाऊसाहेब मासाळ आणि पोलिस नाईक सचिन रामराव पाटील यांना निलंबित करण्यात आहे. हे सर्व समता नगर पोलिस ठाण्याशी संलग्न आहेत. डॉ. सार्थक राठी यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीवरून हे निलंबन करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Antilia Bomb Scare: बडतर्फ अधिकारी सुनील माने याने माफीचा साक्षीदार होण्याची याचिका घेतली मागे)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. राठी आणि त्यांचे मित्र डॉ. शिरीष राव यांना २५ एप्रिलला पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी ताब्यात घेतले होते. दंडात्मक कारवाईसाठी त्या दोघांना समता नगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. डॉ. राठी आणि डॉ. राव यांना तीन तास पोलीस ठाण्यातील अंमलदार कक्षात उभे करण्यात आले होते. त्यांना दंड भरण्यासाठी सांगितल्यावर त्यांच्यातील शाब्दिक वाद सुरू झाला. त्यानंतर ज्या खोलीत गुन्हेगारांची चौकशी केली जाते त्या खोलीत दोघांना आणून पट्ट्याने मारहाण करण्यात आली असा आरोप डॉ. राठी यांनी केला. त्यानंतर उपनिरीक्षक मासाळ आणि पोलीस नाईक पाटील या दोघांनी डॉ. राव यांच्याकडून २५,००० रुपये घेतले.
डॉ. राठी यांनी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर प्राथमिक चौकशीत घटनाक्रम खरा असल्याचे निष्पन्न झाले. या चौकशीत पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, एक डॉक्टर चौकशी कक्षात प्रवेश करताना व बाहेर येताना दिसला. घटना घडली त्या दिवशी पोलिस निरीक्षक प्रकाश पवार हे दिवस पाळीला होते. त्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचे तपासात समोर आले.
उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांनी चौकशीचे पर्यवेक्षण केले. प्राथमिक चौकशीत तीन पोलिसाच्या विरोधात पुरावे मिळाल्यानंतर त्यांना कर्तव्यावरून निलंबित करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community