शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे यांचा पाठलाग करणाऱ्या दोन जणांना दादर पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे प्रभादेवी परिसरातील राहणारे युवक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शीतल म्हात्रे यांचा पाठलाग केल्याप्रकरणी मंगळवारी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर काही तासांतच दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. सागर चव्हाण आणि स्वप्नील माने असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
व्हायरल व्हिडियो प्रकरणानंतर शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी सोमवारी मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिले होते. या निवेदनात त्यांनी दोन इसम मोटारसायकलवरून आपला पाठलाग करून हातवारे करीत असल्याचे म्हटले होते. म्हात्रे या सोमवारी दादर शिवाजी पार्क येथे राहणाऱ्या आईकडे भेटण्यासाठी गेल्या होत्या, तेथून त्या आपल्या मोटारीतून वीर सावरकर मार्गाने बाळासाहेब भवन चर्चगेट येथे जात असताना कीर्ती कॉलेज जंक्शन या ठिकाणी पाठीमागून मोटारसायकलवरून दोन व्यक्ती पाठलाग करून त्यांना हातवारे करीत असल्याचे शीतल म्हात्रे यांनी निवेदनात म्हटले होते. हा प्रकार शीतल म्हात्रे यांच्या संरक्षणासाठी नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई यांनी देखील बघितला होता, सुरक्षेसाठी असलेले पोलीस शिपाई यांनी या दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र हे दोघे प्रभादेवीच्या दिशेने सुसाट निघून गेले.
शीतल म्हात्रे यांनी दिलेल्या या निवेदनावरून दादर पोलिसांनी मंगळवारी दोन अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दादर पोलिसांनी या दोन संशयितांची ओळख पटवून या दोघांना प्रभादेवी परिसरातून ताब्यात घेऊन दोघांना अटक करण्यात आली आहे. सागर चव्हाण आणि स्वप्नील माने असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे प्रभादेवी परिसरात राहण्यास असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे यांचा पाठलाग करून त्यांना हातवारे करण्याचा या दोघांचा उद्देश काय होता याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
(हेही वाचा – १५ फुटाचा लोखंडी रॉड १७ व्या मजल्यावरून रिक्षावर पडला, मायलेकीचा जागीच मृत्यू)
Join Our WhatsApp Community