माटुंगा रुईया महाविद्यालयाच्या मागे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या गच्चीवर पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरु असताना दोन कामगार ३० फुटांवरून पडून गंभीर जखमी झाले होते, दोघांना तात्काळ सायन रुग्णालयात आणले असता एकाच मृत्यू झाला असून दुसऱ्यावर उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
माटुंगा पूर्व रुईया महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या २४७ अ तेलंग रोड या ठिकाणी शिव निर्मल इमारत या १९ मजली इमारतीच्या गच्चीवर पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरु होते, गच्चीवर ३० फूट खोल टाकी बांधण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास राम सहाय तिवारी (५२) आणि अरविंद सदाशिव मिराशी (४५) हे दोन कामगार टाकायचे काम करीत असताना ३० फूट उंच असलेल्या टाकीवरून दोन्ही कामगार गच्चीवर पडले आणि गंभीर जखमी झाले. या दोघांना इतर कामगारांनी या दोन्ही कामगाराना उपचारासाठी सायन रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी राम तिवारी याला तपासून मृत घोषित केले असून अरविंद मिराशी याला उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच माटुंगा पोलिसांनी रुग्णालयात घटनास्थळी धाव घेऊन इतर कामगाराचा जबाब नोंदवला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती माटुंगा पोलीस ठाण्याचे वपोनि, दीपक चव्हाण यांनी दिली.
Join Our WhatsApp Community