शिवसेना उद्धव गटाच्या माजी नगरसेवकासोबत तिघांना अटक

158

गिफ्ट आणि स्टेशनरी दुकान मालकाला धमकावून बळजबरीने दुकान लाटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक योगेश भोईर यांच्यासह तिघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. २०१२ ते २०१७ या कालावधीत भोईर हे शिवसेनेचे कांदिवली येथून नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर त्यांची पत्नी या २०२२ पर्यंत नगरसेवक होत्या. भोईर यांच्यावर एका महिन्यात दोन गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

१४ लाखांचे कर्ज घेतले होते

भोईर आणि त्याचे साथीदार दिनेश ठाकूर आणि गणेश ठाकूर यांच्यावर गुन्हे शाखेने खंडणी, धमकावणे आणि सावकारीसाठी भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कांदिवली येथे स्टेशनरी आणि गिफ्ट आर्टिकलचे दुकान चालवणारे देवराम चौधरी यांनी या तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे पुन्हा एकदा व्यवसाय वाढविण्यासाठी चौधरी यांनी ठाकूर बंधूकडून १४ लाखांचे कर्ज घेतले होते आणि ते हप्त्याने परत करत असल्याचे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा रुपाली ठोंबरे पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी इच्छूक; तृप्ती देसाई म्हणतात शिवराळ कार्यकर्ती)

खंडणीचा गुन्हा दाखल

“चौधरी यांनी गेल्या सात वर्षांत ३५ लाख रुपये दिले आहेत, तरीही ठाकूर बंधू आणखी पैशांची मागणी करत होते. त्यानंतर ठाकूर बंधू यांनी पैशाच्या वसुलीसाठी स्थानिक नगरसेवक योगेश भोईर यांची मदत घेतली. भोईर यांनी चौधरी यांना धमकावले असता घाबरलेल्या चौधरी यांनी जयपूर येथे निघून गेले होते. देवराम चौधरी यांच्यावर दबाव टाकण्यासाठी भोईर आणि ठाकूर बंधूनी चौधरी यांचे काका डोलाराम यांना उचलून आणले आणि कागदपत्रांवर सह्या करून दुकान त्यांच्या नावावर करण्यास भाग पाडले. याप्रकरणी चौधरी यांनी गुन्हे शाखेकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. गुन्हे शाखेने हे प्रकरण कांदिवली युनिट ११कडे सोपविले असता युनिट ११ने भोईर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करून मंगळवारी भोईर आणि ठाकूर बंधू यांना अटक केली आहे.बुधवारी त्याना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.