घरफोडीच्या गुन्हात सुनावली अजब शिक्षा; दररोज पोलीस ठाण्यात हजर राहून….

129
‘दररोज एक तास पोलीस ठाण्यात हजर राहून येणाऱ्या तक्रारदाराला मदत करणे’ अशी आगळीवेगळी शिक्षा घरफोडीच्या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या विधीसंघर्ष बालकाला देण्यात आल्याचा प्रकार मुंबईतील मुलुंड येथे घडला. १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२३ या दरम्यान आरोपीची ही शिक्षा सुरू होणार आहे.
मुलुंड पश्चिम रामगड येथे ऑगस्ट २०२२ रोजी दोन घरातून चार मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून चार दिवसांनी १६ वर्षांच्या विधिसंघर्ष बालक याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीची मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर त्याला ज्यूवेनल कोर्टापुढे हजर करण्यात आले होते, कोर्टाने त्याला कुटूंबियाच्या ताब्यात दिले होते.
मुलुंड पोलिसांनी या गुन्ह्याचे आरोपपत्र नोव्हेंबर महिन्यात ज्यूवेनल कोर्टात दाखल केले होते. न्यायालयाकडून आरोपीने प्रथमच केलेल्या या गुन्ह्यात दोषी ठरवून २३ जानेवारी रोजी आरोपीला आगळीवेगळी शिक्षा सुनावली. ही आगळीवेगळी  शिक्षा म्हणजे आरोपीने १ ते २८ फेब्रुवारीच्या कालावधीत मुलुंड पोलीस ठाण्यात दररोज एक तास हजर राहून पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदार, ज्येष्ठ नागरिक, विकलांग नागरिकांना मदत करणे त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना संबंधित अधिकारी यांच्या पर्यंत पोहोचवणे ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. या आरोपीची ही शिक्षा १ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होणार असून त्याला सकाळी १० वाजता पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे असे तपास अधिकारी सपोनि. संतोष कांबळे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.