सायन रुग्णालयातील परिचारिकेला रेल्वे अपघातात आपला एक पाय आणि एक हात गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. कामावर वेळेवर पोहचण्यासाठी थांबलेल्या मालगाडीच्या खालून रूळ ओलांडत असताना अचानक मालगाडी सुरू होऊन झालेल्या अपघातात तीला तिचा एक पाय आणि हात कायमचा गमवावा लागला आहे. ही दुर्घटना शनिवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली.
विद्या वखारीकर (५४) असे या अपघातग्रस्त परिचारिकेचे नाव आहे. आसनगाव येथे राहणाऱ्या विद्या वखारीकर या सायन येथील मनपाच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात परिचारिका म्हणून नोकरीस आहे. शनिवारी त्या पहाटे ५ वाजून ४४ मिनिटांची आसनगाव येथून सीएसएमटीकडे सुटणारी लोकल ट्रेन पकडण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. ट्रेन रेल्वे स्थानकात थांबलेली होती. ट्रेन पकडण्यासाठी फलाटावर जाण्यासाठी त्यांनी रेल्वे पुलाचा वापर न करता रेल्वे रूळ ओलांडून जाण्याचा निर्णय घेतला, आणि नेमकी रेल्वे रूळावर एक मालगाडी येऊन थांबली होती.
(हेही वाचा – ….या कारणामुळे त्याने ‘आरडीएक्स’ वाहतुकीची खबर पोलिसांना दिली)
बराच वेळ थांबूनही मालगाडी काही जात नव्हती, उशीर होत असल्यामुळे अखेर विद्या वखारीकर ह्यांनी मालगाडीच्या खालून रूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि नेमकी त्याच वेळी मालगाडी सुरू होऊन विद्या वखारीकर यांचा डावा हात आणि डावा पाय मालगाडीच्या चाकाखाली चिरडून त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ रेल्वे पोलिसांनी प्राथमिक उपचारानंतर मुंबईच्या सायन रुग्णालयात आणले. सायन रुग्णालयाच्या डॉक्टरांना त्यांचे हात आणि पाय वाचवण्यात अपयश आले. विद्या यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तीचा डावा हात आणि डावा पाय कापून काढावा लागेल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली. आसनगावच्या रहिवासी असलेल्या वखारीकर या कामानिमित्त आसनगाव ते सायन असा रोज ट्रेनने प्रवास करीत होत्या. वखारीकर यांना तीन मुले असून त्यांच्या पतीचा ऑटोचा व्यवसाय आहे, त्याच्यावर पुढील उपचार सुरू असून त्या पूर्णपणे शुद्धीवर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community