माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) हत्या प्रकरणात नवीन वाद निर्माण झाला आहे. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबाची प्रत व्हायरल झाली असून या जबाबात दोन राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या नावाचा उल्लेख झिशान याने आपल्या जबाबात केला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे प्रमुख कारण संत ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा भाग असल्याचा आरोप झिशान याने केला आहे. तसेच हत्येच्या दिवशी माझ्या वडिलांनी (बाबा सिद्दीकी) डायरीमध्ये मोहीत कंबोज यांच्या नावाचा उल्लेख केलेला असून माझ्या वडीलांच्या फोनमध्ये व्हॉटस् अपद्वारे मोहीत कंबोज यांच्याशी सायंकाळी अर्धा तास बोलत होते असे झिशान यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. झिशानने पोलिसांना दिलेल्या जबाबाचे विपर्यास केला जात असल्याचे मोहित कंबोज यांनी म्हटले असून बाबा आणि आम्ही चांगले मित्र होतो आम्ही नेहमी एकमेकांशी राजकीय घडामोडीवर चर्चा करीत असे, असा खुलासा कंबोज यांनी केला आहे.
वांद्रे पश्चिम येथे राहणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्यावर १२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास वांद्रे पूर्व येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मुख्य हल्लेखोरासह २६ जणांना अटक केली आहे. या हत्येचा मुख्य सूत्रधार लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई असल्याचे समोर आले. दहशतवादी दाऊद याच्यासोबत असलेली जवळीक तसेच बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यासोबत असलेली मैत्रीमुळे बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची अनमोल बिष्णोई याने सुपारी देऊन हत्या घडवून आणली असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असल्याचे पोलीसानी न्यायालयात नुकतेच सादर केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
राज्यमंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्ये प्रकरणात गुन्ह्याचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेने सिद्दीकी यांचे आमदार पुत्र झिशान सिद्दीकी यांचा जबाब नोंदवून घेतला होता, झिशान यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, वांद्रे पूर्व विधानराभा मतदार संघामध्ये असलेल्या संत ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये विकासकांकडून झोपडपट्टी धारकांवर अन्याय होत असल्याने मी सातत्याने नागरीकांच्या हक्कासाठी आंदोलन करुन त्यांची बाजू लावून धरत होतो. त्याच दरम्यान खेरवाडी पोलीस ठाणे येथे माझा कोणताही दोष नसताना माझ्यावर खोटा गुन्हा नोंद करण्यात आला. त्यावेळी मी झोपडपट्टी धारकांना त्यांचा लोकप्रतिनिधी या नात्याने सांगितले की, तुम्ही कोणत्याही दबावाला बळी न पडता, तुमच्या मर्जीनेच एस.आर.ए. सर्व्हे दरम्यान सहमती दर्शवा, असे झिशान यांनी जबाबात म्हटले आहे, पुढे ते असे म्हणाले की, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा सर्व्हे सुरु होण्यापुर्वी उबाठा पक्षाचे नेते अनिल परब यांनी जनरल बॉडी रिझोल्युशन घेण्यासाठी झोपडपट्टी धारकांची सभा घेतली होती, त्यावेळी परब तेथील लोकांना म्हणाले होते कि तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना, तर मी कोणताही विकासक आणेन, त्याला तुम्ही मान्यता द्या असे झिशान यांनी जबाबात म्हटले आहे, त्यानंतर मी नमूद झोपडपट्टी धारकांची पुन्हा बैठक घेवून त्यांना सांगितले की, तुम्ही कोणताही विकासक नेमा, परंतु विकासक नेमताना विचार करुन व सर्व कागदपत्रे वाचून कोणत्याही दबावाला बळी न पडता, तुम्हाला मान्य असल्यास तुम्ही स्वाक्षरी करा.
(हेही वाचा वक्फ कायदा सुधारणेला शिवसेना उबाठाचा विरोध, हिंदुत्वाच्या भूमिकेवर BJP चा हल्लाबोल)
त्यानंतर विकासक पृथ्वी चव्हाण यांनी मला संपर्क साधून कळविले की, तुम्ही काळजी करु नका, झोपडपट्टी धारकांना त्यांच्या घराच्या बदल्यात त्याच ठिकाणी घर देण्यात येईल अशी खात्री दिली. त्यानंतर जनरल बॉडी रिझोल्युशनमध्ये मी सहभागी झालो. त्यावेळी मंचावर पुथ्वी चव्हाण, त्यांचा पार्टनर नबील पटेल, उबाठा नेते अनिल परब व मी उपस्थित होतो. त्यावेळी विकासकांनी झोपडपट्टी धारकांना पुनर्वसनामध्ये त्यांच्या घराच्या बदल्यात त्याच ठिकाणी घर मिळेल असे वचन दिले होते. परंतु त्यांनतर मला झोपडपट्टीधारकांकडून असे समजले की, विकासकाकडून देण्यात आलेल्या करारनाम्यामध्ये दिशाभूल करणारे मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. त्यामध्ये झोपडपट्टी धारकांना मुंबई शहरामध्ये इतरत्र कोठेही घर देण्यात येईल असे त्यांच्या वाचनामध्ये आले होते. त्यामुळे झोपडपट्टी धारकांमध्ये नाराजी होती. म्हणून नागरीकांनी मला त्यांचेकडून जबरदस्तीने सह्या करुन घेण्यात येत असल्याचे सांगितले व त्यांच्या विंनतीवरुन मी तेथे पोहोचलो व झोपडपट्टी धारकांना सांगितले की, तुम्ही कोणत्याही दबावाला बळी न पडता, तुम्हाला योग्य वाटल्यास सह्या करा अन्यथा सह्या करु नका. त्या प्रकरणावरुन माझेविरुध्द खेरवाडी पोलीस ठाणे येथे खोटा गुन्हा नोंद करण्यात आला होता असे झिशान सिद्दीकीने आपल्या जबाबात म्हटले आहे. माझेविरुध्द खोटा गुन्हा नोंद झाल्यानंतर विकासक पृथ्वी चव्हाण याने माझ्या वडीलांशी संपर्क साधून त्यांना असभ्यपणे असे सांगितले की, तुमचे काय आहे, मला जसे वाटेल, तसे मी करेन. तसेच माझे राहत्या घरी सकाळी पोलीस आले.
त्यानंतर मला मिळालेल्या शासकीय निधीमधून ज्ञानेश्वर नगर येथे काम सुरु असताना खेरवाडी पोलीस ठाण्याच्या अधिक-यांनी काम करीत असलेल्या कामगारांना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात नेवून काम बंद पाडले. सर्वसाधारणपणे कोणतेही शासकीय काम थांबविण्यासाठी संबंधित शासकीय विभागाकडून पोलीसांकडे संरक्षणाची मागणी केली जाते व काम थांबविले जाते. परंतु नमूद प्रकरणामध्ये कोणत्याही शासकीय विभागाकडून काम थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत संबंधीत शासकीय यंत्रणा सोबत नव्हती. पोलिसांनी थेट काम बंद पाडले होते. खेरवाड़ी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कुवर यांनी असे सांगितले की, आता मी तुम्हाला इथे काम करू देणार नाही. त्याचदरम्यान खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुळीक यांनी माझा फोन घेतला नाही व माझे पी.ए. त्यांना भेटण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये गेले असता त्यांनी ३ ते ४ तास थांबवून त्याला भेट दिली नाही. म्हणून मी डी. सी.पी. गेडाम साहेबांना नमूद प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली असता त्यांनी तात्काळ खेरवाडी पोलीस ठाणे येथे फोन करुन ताब्यात घेण्यात आलेल्या कामगारांना सोडून देण्यास सांगितले असे झिशानने आपल्या जबाबात म्हटले आहे.
विकासक यांच्याकडून या सर्व प्रकरणामध्ये खेरवाडी पोलीसांच्या माध्यमातून माझेवर दबाव निर्माण केला जात होता असे मत झिशान यांनी जबाबात मांडले आहे. झिशान यांनी आपल्या जबाबात पुढे असे म्हटले आहे की, वांद्रे पूर्व व पश्चिम परिसरामध्ये सुरु असलेल्या इतर झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये झोपडपट्टी धारकांच्या हक्कासाठी मी सातत्याने लढा देत होतो. त्यामध्ये अनेक विकासकांकडून नागरीकांवर अन्याय केला जात असल्यामुळे नागरीक माझेकडे संपर्क साधत होते. मी त्यांच्या मदतीसाठी त्यांच्या सोबत होतो. त्यामध्ये अनेक विकासक आहेत, जसे पुथ्वी चव्हाण, शाहीद बलवा, शिवालीक व्हेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोयंका, परवेज लकडावाला, मुंद्रा बिल्डर्स, विजय ठक्कर, ओमकार बिल्डर. तसेच भाजप नेता मोहीत कंबोज यांचा माझे वडीलांशी नियमितपणे संपर्क होता. माझ्या वडीलांना नियमितपणे दैनंदिन कामाविषयी डायरी लिहीण्याची सवय होती. माझे वडिलांच्या हत्येच्या दिवशी माझे वडीलांनी डायरीमध्ये मोहीत कंबोज यांचे नावाचा उल्लेख केलेला असून माझे वडीलांच्या फोनमध्ये व्हॉटस् अपद्वारे मोहीत कंबोज यांच्याशी सायंकाळी ५.३० ते ६.०० वा. च्या दरम्यान संपर्क झाल्याचे मला समजले. मोहीत कंबोज यांना वांद्रा पुर्व परिसरात सुरु करायच्या मुंद्रा बिल्डर्सच्या प्रकल्पाबाबत माझे वडीलांना भेटायचे होते. मुंद्रा बिल्डर्सने झोपडपट्टीधारकांना संपर्क साधत असताना त्यांनी माझे वडीलांबाबत अपशब्द वापरल्याबाबतचे व्हिडीओ माझेकडे आले होते. तसेच माझे वडीलांचा २ दिवसामध्ये विधान परिषद आमदार म्हणून शपथविधी होणार होता. असे झिशान याने आपल्या जबाबात म्हटले आहे. कंबोज यांनी एका निवेदनात म्हटले आहे, झिशानच्या जबाब खळबळजनक करण्यासाठी तथ्यांचा विपर्यास केल्याचा आरोप कम्बोज यांनी केला आहे. “झीशानच्या विधानाचा विपर्यास केला जात आहे. बाबा माझा चांगले मित्र होते आणि ज्या दिवशी त्याची हत्या झाली त्या दिवशी आम्ही बोललो होतो. वांद्रे येथील रहिवासी असल्याने आम्ही गेल्या १५ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होतो. आम्ही अनेकदा राजकीय आणि गैर-राजकीय दोन्ही विषयांवर चर्चा करत होतो,” असे कंबोज म्हणाले. त्यांचा मृत्यू आमच्या सर्वांसाठी धक्कादायक होता. मी त्या दिवशी कुटुंबाला मदत करण्यासाठी रुग्णालयात गेलो होतो,” असे ते पुढे म्हणाले.
Join Our WhatsApp Community