वरळी सीफेस परिसरात भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

मुंबई वरळी सीफेसवर भरधाव कारने रविवारी सकाळी जॉगिंगला आलेल्या महिलेला धडक दिल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. राजलक्ष्मी राम कृष्णन असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. वरळी सीफेसजवळील वरळी डेअरीजवळ हा अपघात झाला. मृत महिला ही दादर-माटुंगा परिसरातील रहिवासी असून वैद्यकीय चाचणीनंतर चालकाला अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातामध्ये चालक देखील जखमी झाला आहे.

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने राजलक्ष्मी यांना मागून धडक दिली. कारच्या धडकेत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच राजलक्ष्मी यांचा मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

(हेही वाचा लालपरी नव्या रुपात; एसटीच्या ताफ्यात येणार स्लीपर बस)

अपघातानंतर स्थानिकांनी चालकाला पकडून वरळी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या चालकाची वैद्यकीय चाचणी केली असून यात हा चालक दारुच्या नशेत असल्याची माहिती मिळाली आहे. भरधाव वेगाने नियंत्रण न ठेवता वाहन चालवल्याच्या कलमांतर्गत हा चालक सुमेर मर्चंट याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत दरम्यान, या परिसरात किनारी मार्गाचे काम सुरू असल्याने चालण्यासाठी येणाऱ्यांना जागा अपुरी पडते म्हणून अशा घटना घडतात असे स्थानिकांनी पोलिसांना सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here