वरळी हिट अँड रन प्रकरणातील (Worli Hit and Run Case) मुख्य आरोपी मिहीर शहा याच्या विरुद्ध लुकआउट नोटिस (LOC) पोलिसांनी जारी केली आहे. अपघातानंतर मिहीर शहाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची ६ पथके त्याच्या मागावर असून अद्याप तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मिहीर हा परदेशात पळून जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्यामुळे त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी म्हटले आहे. दरम्यान या अपघाताप्रकरणी वरळी पोलिसांनी मिहीरचे वडील राजेश शहा आणि मिहीर सोबत असलेला वाहन चालक राजऋषी बिदावत यांना अटक केली आहे. (Worli Hit and Run Case)
पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा (२२) याने त्याच्या बीएमडब्ल्यू या मोटारीने वरळीतील डॉ. ॲनी बेझंट रोडवर असलेल्या अट्रिया मॉलजवळ एका कोळी दाम्पत्याच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या धडकेनंतर मिहीर याने मोटार न थांबवता, दुचाकीवर असलेल्या महिलेला दोन किलोमीटर फरफटत नेले, त्यात कावेरी नाखवा महिलेचा मृत्यू झाला, तिचा पती प्रदीप नाखवा हे जखमी झाले होते. हे दाम्पत्य वरळी कोळीवाडा येथे राहणारे असून रविवारी पहाटे ते ससून डॉक येथे मासे खरेदी करण्यासाठी गेले होते, तेथून परतत असतांना हा अपघात झाला. (Worli Hit and Run Case)
(हेही वाचा – Chinese armyने लडाखजवळ शस्त्रे गोळा केली, सॅटेलाइट फोटोवरून कोणती माहिती उघड झाली? वाचा सविस्तर…)
मिहीर शहावर ‘हे’ गुन्हे दाखल
या अपघातानंतर पळून गेलेल्या मिहीर शहा याने वांद्रे कलानगर येथे अपघातग्रस्त मोटार सोडून दोन रिक्षा केल्या, एका रिक्षात चालकाला जाण्यास सांगून दुसऱ्या रिक्षात तो एकटाच निघून गेला. या दरम्यान मिहीर याने वडिलांना फोन करून अपघाताची माहिती दिली, त्यानंतर त्याने आपला फोन स्विच ऑफ केला. या अपघात प्रकरणी वरळी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०५ (सदोष मनुष्यवध), २८१ (बेदरकारपणे वाहन चालवणे), १२५ (ब)(इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणे), २३८(गुन्हेगाराला वाचविण्यासाठी गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे किंवा खोटी माहिती देणे), ३२४(४)(नुकसान करणे) मोटार वाहन कायदा कलम-१८४, १३४(अ), १३४ (ब), १८७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी मिहीर शहाचे वडील राजेश शहा आणि चालक राजऋषी बिदावत यांना अटक केली आहे. मुख्य आरोपी मिहीर हा फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी वरळी पोलिसांची ६ विविध पथके त्याच्या मागावर असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. (Worli Hit and Run Case)
मिहीर हा अटकेपासून स्वत:ला वाचवण्यासाठी देश सोडून पळून जाऊ शकतो असा संशय असून त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस (एलओसी) जारी करण्यात आली आहे. एकदा आरोपी किंवा संशयितांविरुद्ध एलओसी जारी केल्यानंतर ते विमानतळ किंवा बंदरांमधून देशाबाहेर जाऊ शकत नाहीत. जर ती व्यक्ती अजूनही पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर इमिग्रेशन कर्मचारी त्यांना ताब्यात घेऊ शकतात आणि संबंधित तपास यंत्रणेकडे सोपवू शकतात अशी माहीती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. जुहू येथील बारमध्ये एका पार्टीदरम्यान मिहीरने मद्यप्राशन केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी बारच्या सीसीटीव्हीमधून आणि अपघातस्थळवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून फुटेज गोळा केले आहे. मिहीर याने जुहू येथील बारमध्ये मद्यपान केल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी त्याच्यासोबत असणारे त्याचे मित्र, बार मधील मॅनेजर, वेटर यांचे जबाब नोंदवले आहेत. त्यांच्या जबाबावरून मिहीरने मद्यपान केल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच इतरांचे जबाब आणि इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारे मिहीरने मद्यपान करून वाहन चालवून अपघात केल्याचे स्पष्ट झाले आहे. (Worli Hit and Run Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community