Mulund Hit and Run : मुलुंडमध्ये वरळी हिट अँड रनची पुनरावृत्ती; ४ जखमी, आरोपीला अटक

202
Mulund Hit and Run : मुलुंडमध्ये वरळी हिट अँड रनची पुनरावृत्ती; ४ जखमी, आरोपीला अटक

पुणे पोर्शे अपघाताच्या घटनेनंतर राज्यात अपघातांची मालिका सुरू आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतील वरळी येथे झालेल्या हिट अँड रनच्या घटनेला पंधरा दिवस उलटत नाही तोच मुलुंड पश्चिम येथे सोमवारी (२२ जुलै) सकाळी या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या ४३ वर्षीय इसमाने ऑडी कार भरधाव वेगात चालवून समोरून येणाऱ्या दोन रिक्षांना धडक दिली. या भीषण अपघातात दोन प्रवाशांसह चार जण जखमी झाले. जखमींना तातडीने अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गाडी सोडून पळून गेलेल्या ऑडी चालकाला कांजूरमार्ग येथून अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात ऑडी चालकाने मद्यपान केले होते अशी माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांनी दिली. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गून्हा दाखल करण्यात आला आहे. (Mulund Hit and Run)

विजय दत्तात्रय गोरे (४३) असे अपघाताप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ऑडी चालकाचे नाव आहे. विजय कांजूरमार्ग पश्चिम येथील रूनवाल फॉरेस्ट या ठिकाणी पत्नी आणि मुलांसह राहण्यास आहेत. विजय हा एका आयटी कंपनीत नोकरीला असून तो ‘वर्क फॉर्म होम’ करतो. रविवारी रात्री विजयने भांडुपच्या एका बार मध्ये मद्यपान केले, त्यानंतर तो स्वतःची ऑडी मोटार (एमएच-०१-बीके-०११९) स्वतः चालवत ठाण्याला गेला. त्या ठिकाणी मित्रांसोबत मद्यपान केल्यानंतर त्याचे काही मित्र आणि विजय कर्जतला गेले, रात्रभर मौजमजा केल्यानंतर सोमवारी पहाटे ६ वाजता विजय हा ठाण्यात आला. त्याठिकाणी त्याने मित्रांना सोडून मुंबईच्या दिशेने जाताना मुलुंड पश्चिम डम्पिंग रोड येथे भरधाव वेगात असलेल्या ऑडीने प्रवाशी घेऊन मुलुंड स्थानकाकडे निघालेल्या दोन रिक्षांना समोरून धडक दिली. (Mulund Hit and Run)

(हेही वाचा – Parliament Session : पीक विमा नेमका कुणासाठी? ओमराजे निंबाळकर यांचा सवाल)

ही धडक एवढी भीषण होती की दोन्ही रिक्षांचा चेंदामेंदा झाला. या घटनेनंतर घाबरलेल्या विजयने मोटार तेथेच सोडून पळ काढला. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मुलुंड पोलिसांना कळवून जखमींना रिक्षातून बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी आलेल्या मुलुंड पोलिसांनी जखमीचा जबाब नोंदवून घटनास्थळी मिळून आलेली ऑडी कार आणि अपघातग्रस्त रिक्षा ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणल्या. या अपघातात दोन रिक्षाचालकांसह एक रेल्वे कर्मचारी आणि बेस्टमध्ये काम करणारे दोघे असे चौघे जण जखमी झाले आहेत. प्रकाश जाधव (४६) राहणार, शिवाजी नगर ठाणे, हणमंत चव्हाण (५७) राहणार मुलुंड पश्चिम, संतोष वालेकर (४९) आणि विवेक जयस्वाल (२६) वालेकर आणि जयस्वाल हे दोघे रिक्षाचालक असून इतर दोघे रिक्षातील प्रवाशी आहेत. (Mulund Hit and Run)

मुलुंड पोलिसांनी तात्काळ या अपघातातील चालकाचा शोध सुरू केला असता, पोलिसांना ऑडी या मोटारीत एक मोबाईल फोन मिळून आला. या मोबाईल फोनच्या आधारे पोलिसांनी ऑडी चालक विजय गोरे याला कांजूरमार्ग पूर्व येथून बहिणीच्या घरातून अटक केली. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत विजय गोरे याच्या तोंडाला मद्याचा वास येत होता अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांनी दिली. या प्रकरणी विजय गोरे विरुद्ध सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑडी चालकाने मद्यपान केले होते अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांनी दिली असून मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. (Mulund Hit and Run)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.