येरवडा मध्यवर्ती कारागृहाचा जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत तिसरा क्रमांक

178

राज्यातील येरवडा कारागृहाने जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत जगात तिसरा क्रमांक पटकावला असून भारतात पहिला क्रमांक पटकावला आहे. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी पार पडलेल्या दुसऱ्या जागतिक आंतर कारागृह स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृह संघाने एल सालव्हाडोर संघाचा ३-१ गुणांनी पराभव करत कांस्यपदक पटकावले. फिलिपिन्सने कोलंबियाचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले.

( हेही वाचा : दीड महिन्यात १ कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी घेतला मोफत एसटी प्रवासाचा लाभ)

जगभरातील ४६ देशांमधील ६४ कारागृहांचे संघ या जागतिक बुद्धीबळ स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. या आधी ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी झालेल्या अखिल भारतीय आंतर कारागृह स्पर्धेत येरवडा तुरुंग व प्रयागराज तुरुंगाने अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून जागतिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत प्रवेश निश्चित केला होता.

केवळ दुसऱ्यांदाच होत असलेली जागतिक ऑनलाईन आंतर कारागृहा स्पर्धा ही दोन स्तरांवर खेळवण्यात आली. ६४ संघांची आठ गटात विभागणी करून त्यांच्यात साखळी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये येरवडा संघाचा समावेश प्रथम गटात होता. या गटात झालेल्या सात सामन्यात येरवडा संघाने ५ विजय १ बरोबरी व १ पराभव अशी कामगिरी करत गटातून उपविजेते पद मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

आठ गटातील प्रथम दोन असे १६ संघ अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले. त्यांची दोन गटात विभागणी करून परत एकदा साखळी सामने घेण्यात आले. या स्पर्धेत देखील येरवडा संघाने ५ विजय १ बरोबरी व १ पराभव स्वीकारत उपविजेते पद प्राप्त केले. यामध्ये येरवडा संघाने माजी विजेत्या मंगोलिया चा ३-१ ने पराभव केला, स्पर्धा विजेत्या फिलिपिन्सला २-२ असे बरोबरीत रोखले व झिम्बाब्वे संघाकडून १-३ ने पराभव स्वीकारला. या गटातील विजेते फिलिपिन्स संघ व दुसऱ्या गटातील विजेते कोलंबिया संघ यांमध्ये प्रथम दोन क्रमांकाची लढत झाली. दोन्ही गटातील उप विजेत्यांमध्ये तृतीय व चौथ्यां क्रमांकाची लढत झाली या लढतीत येरवडा संघ विजयी ठरला व कांस्यपदक पटकावले.

या वर्षी प्रथमच भारतामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेडने ‘प्रिझन टू प्राईड’ या उपक्रमाअंतर्गत भारतातील २१ कारागृहातील बंदीसाठी बुद्धिबळ प्रशिक्षण कार्यक्रम राबविला होता. केतन खैरे यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृह संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांना सहप्रशिक्षक सागर मोहिते यांनी मोलाची साथ दिली. संपूर्ण स्पर्धेचे नियमन हे मुख्य पंच पवन कातकडे यांनी केले व स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडली. गणेश माळकरी यांनी संपूर्ण स्पर्धेदरम्यान कंप्युटर व इंटरनेट नेटवर्क सुरळीत ठेवण्याची जबाबदारी पार पाडली. आयओसिएलचे योगेश परदेशी यांनी येरवडा कारागृह संघाचे व्यवस्थापन केले व सुरुवातीपासून सर्व उपक्रमाचे काटेकोर नियोजन केले. कारागृहातर्फे अंगद गव्हाणे यांनी समन्वय ठेवला. डीआयजी स्वाती साठे, अधीक्षक शिवशंकर पाटील, वरिष्ठ जेलर रवींद्र गायकवाड यांनी दिलेल्या सक्रिय प्रोत्साहनामुळेच हा उपक्रम यशस्वी होऊ शकला व बंदीजनांना नवीन कौशल्य आत्मसात करण्याची संधी प्राप्त झाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.