राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) परीक्षा ही १४ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेत एकूण ८ हजारांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या उत्तीर्ण उमेदवारांच्या यादीत १ हजारहून अधिक महिलांचा समावेश आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेली ही पहिलीच एनडीए परीक्षा होती. यात महिला उमेदवारांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
पुढील परीक्षेसाठी पात्र
परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ८ हजार ९ उमेदवारांपैकी ७ हजार ६ पुरुष आहेत. तर पुढच्या पात्र परीक्षेसाठी १ हजार २ महिला उमेदवार सेवा निवड मंडळ चाचणी आणि वैद्यकीय चाचण्यांसाठी उपस्थित राहतील. यातून भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात अधिकारी म्हणून सामील होण्यासाठी पुढील वर्षीच्या अभ्यासक्रमासाठी एकूण १९ महिलांची निवड केली जाईल.
( हेही वाचा : आता व्होटर आयडी ‘आधार’ शी होणार लिंक; जाणून घ्या कारण )
फायटर स्ट्रीममध्ये समावेश
संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी यापूर्वी राज्यसभेत माहिती दिली होती की १ लाख ७७ हजार ६५४ महिलांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. २०१५ मध्ये लष्करातील महिलांसाठी एक टर्निंग पॉइंट आला जेव्हा, भारतीय हवाई दलाने त्यांना फायटर स्ट्रीममध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. या वर्षाच्या सुरुवातीला, भारतीय नौदलाने सुमारे २५ वर्षानंतर चार महिला अधिकाऱ्यांना युद्धनौकांवर तैनात केले. गेल्या सहा वर्षांत सैन्यात महिलांची संख्या जवळजवळ तीन पटीने वाढली आहे. फेब्रुवारीपर्यंत लष्कर, नौदल आणि हवाई दलात ९ हजार ११८ महिला सेवा देत होत्या.
Join Our WhatsApp Community