हिंदुस्थानात वर्ष १६०० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. या ईस्ट इंडिया कंपनीने वर्ष १७७६ मध्ये सैन्य दलाची स्थापना कोलकतामध्ये केली. या सैन्य दलावर स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांचे वर्चस्व होते. इंग्रजांनी आपल्या देशावर सुमारे १५० वर्षे राज्य केले. आपण ब्रिटिशांच्या विरुद्ध विविध मार्गाने लढून आपला देश १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी पारतंत्र्यातून मुक्त केला आणि आपण स्वतंत्र झालो. तरीही आपण स्वतंत्र झाल्यानंतर सुमारे दोन वर्षे या सैन्य दलाचे प्रमुख पद इंग्रज अधिकारीच भूषवित होते. ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन केलेल्या या सैन्य दलाचा अखेरचा कमांडर जनरल फ्रान्सिस बुचर होता. त्याने १५ जानेवारी १९४९ या दिवशी या सैन्य दलाची सर्व सूत्रे हिंदुस्थानचे लेफ्टनंट जनरल करिअप्पा यांच्याकडे सुपूर्द केली. स्वतंत्र हिंदुस्थानचे सैन्य दलाचे पहिले कमांडर म्हणून करिअप्पा यांची नोंद हिंदुस्थानच्या इतिहासात करण्यात आली. हाच दिवस आपण सैन्य दिवस म्हणून साजरा करतो.
सैन्यांचे मनोबल वाढवण्याची संधी
करिआप्पा यांनी भारतीय सैन्यदलाच्या प्रमुख पदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी आपल्या सैन्य दलात दोन लाख सैनिक होते. आता त्यांची संख्या १२ लाखांपेक्षा अधिक आहे. अमेरिका आणि चीन यानंतर जगातील सर्वात मोठे सैन्य असलेला देश म्हणून आपल्या देशाचा क्रमांक लागतो. आपल्या देशातल्या सैनिकाच्या शौर्याचे, पराक्रमाचे होणारे पोवाडे गायलेच पाहिजेत. त्यांची राष्ट्रनिष्ठा त्यांचा पराक्रम दुर्लक्षित करण्यासारखी गोष्ट नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशावर शत्रूंनी आक्रमण करून आपल्याला उपद्रव दिला. पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रांनी आपली भूमी अवैधपणे गिळंकृत केली. अशा कपटी शत्रूबरोबर आपल्या सैनिकांना वारंवार लढावे लागत आहे. सैनिकांचे मनोबल नष्ट करण्याचा प्रयत्न काही राष्ट्र विघातक शक्तींकडून वारंवार केला जात आहे. म्हणूनच आपल्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी देशातील सर्वसामान्य जनतेने स्थलसेना दिनाचे औचित्य साधून भारतीय सेनेविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे मनोबल वाढवण्याची ही संधी आपण गमावता कामा नये. त्याचबरोबर आजच्या दिवसाचे औचित्य साधून हिंदुस्थानचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ या वीर सेनानींचा थोडक्यात परिचय करून देणे उचित ठरेल.
(हेही वाचा ‘वन-डे’मध्ये विराटच बेस्ट; विश्वविक्रमापासून तीन शतके दूर)
१९७१च्या युद्धाच्या विजयाचा नायक!
वर्ष १९७१ मध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले. या युद्धाचे नेतृत्व सॅम माणेकशॉ यांनी केले होते. या युद्धात हिंदुस्थानने पाकिस्तानचा पराभव केला आणि बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्र उदयाला आले. सॅम माणेकशॉ यांचा जन्म ३ एप्रिल १९१४ या दिवशी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अमृतसरला झाले. त्यानंतर नैनिताल मधल्या शेरवुड महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकादमीच्या १९३२च्या पहिल्या बॅचचे ते विद्यार्थी होते. वर्ष १९३४ मध्ये ते हिंदुस्थानच्या सैन्यात भरती झाले. सतराव्या इन्फंट्री डिव्हिजनच्या वतीने ते दुसऱ्या महायुद्धात लढले. फ्रंट इयर फोर्स रेजिमेंट चेक कॅप्टन म्हणून बर्माच्या मोहिमेवर ते गेले. त्यावेळी सितांग नदीच्या किनाऱ्यावर जपानी सैनिकांबरोबर त्यांचे घनघोर युद्ध झाले. त्या युद्धात ते जखमी झाले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. थोड्याच दिवसात बरे झाल्यानंतर पुन्हा बर्मा मधल्या जंगलात जपानी सैनिकांशी लढण्यासाठी ते सज्ज झाले. जपानी सैनिकांशी लढताना ते पुन्हा जखमी झाले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर माणेकशॉ यांची स्टाफ ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली. जपानी सैनिकांनी शरण यावे म्हणून त्यांना पाठवण्यात आले. सैनिकांच्या पुनर्वसनाचे दायित्वही त्यांच्यावर सोपवण्यात आले होते. त्यांनी सुमारे दहा सहस्त्र युद्ध बंदिवानांचे पुनर्वसन केले. देश स्वतंत्र झाल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात जे युद्ध झाले त्या युद्धात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ईशान्य भारतातील नागालँड म्हणजेच नागभूमीमध्ये काही समस्या निर्माण झाल्या. त्या समस्या सोडवण्याचे दायित्व त्यांच्यावर सोपवण्यात आले होते. तिथल्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हिंदुस्थान सरकारने वर्ष १९६८ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. सैनिकी अधिकारी म्हणून त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत चोख भूमिका बजावली. म्हणून त्यांना ७ जून १९६९ या दिवशी जनरल कुमारमंगलम यांच्यानंतर हिंदुस्थानच्या चिफ आर्मी स्टाफ या पदावर नियुक्त करण्यात आले.
वीरपुत्रांचे नित्य स्मरण राष्ट्रीय कर्तव्य
वर्ष १९७१ मध्ये हिंदुस्थानने पाकिस्तानवर जो निर्णायक विजय संपादन करून एक इतिहास रचला, त्याचे सर्व श्रेय सॅम माणेकशॉ यांना जाते. त्यांची उत्कट देशभक्ती आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी केलेली देशाची सेवा आणि देशाचे संरक्षण या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हिंदुस्थान सरकारने त्यांना वर्ष १९७२ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्यानंतर एका वर्षातच म्हणजे १ जानेवारी १९७३ या दिवशी फिल्ड मार्शल या सर्वोच्च पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. हिंदुस्थानचे पहिले फिल्ड मार्शल होण्याचा मान सॅम माणेकशॉ यांना मिळाला आहे. भारतमातेची सलग चाळीस वर्षे सेवा केल्यानंतर भारतमातेचा हा वीर पुत्र १५ जानेवारी १९७३ या दिवशी सेवानिवृत्त झाला. सॅम माणेकशॉ निर्भीड होते. अशा अनेकानेक भारतमातेच्या वीरपुत्रांचे आपण नित्य स्मरण करून त्यांच्या विषयी कृतज्ञता बाळगणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपले हे वीर जवान आपल्या देश बांधवांच्या रक्षणार्थ, देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी झुंजत असतात. प्रसंगी प्राण अर्पण करतात. नैसर्गिक आपत्तीच्या काळातही आपल्या बांधवांच्या रक्षणार्थ जीव धोक्यात घालतात. त्यांच्या या नसेवेची कदर आपण केली पाहिजे.