छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवर झालेल्या पोलीस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमकीत एका जहाल नेत्यासह नऊ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलीस जवानांना यश आले आहे. यात पाच महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांवर एकूण ६० लाखांपेक्षा अधिक बक्षीस होते, अशी माहिती बस्तर क्षेत्राचे महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी दिली.
सात तास चाललेली चकमक
३ सप्टेंबर रोजी छत्तीसगडमधील (Chhattisgarh) दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमाभागातील लोहगाव पुरंगेल एन्ड्री जंगल परिसरात सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास जिल्हा राखीव दल (डीआरजी) आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून (सीआरपीएफ) संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान रबविण्यात आले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. दरम्यान, पोलिसांनी देखील प्रत्युत्तर दिले. यावेळी दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. सात तास चाललेल्या या चकमकीत ९ नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आहे. यात वारंगल येथील रहिवासी नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य विशेष झोनल समितीचा सदस्य रणधीरचा देखील मृत्यू झाला. त्याच्यावर ३० लाखापेक्षा अधिक बक्षीस होते. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू होती व परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली. यावेळी घटनास्थळावरून एसएलआर, ३०३ आणि १२ बोरची हत्यारे तसेच मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली आहे. या वर्षभरात छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत तब्बल १५३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community