‘हनी ट्रॅप’मध्ये अडकून हेरगिरी करणाऱ्या जवानाला अटक

116

भारतीय हवाई दलाच्या एका जवानाला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला संवेदनशील माहिती पाठवून हेरगिरी केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या या हवाई सैनिकाकडून उच्च अधिकाऱ्यांच्या तैनातीची ठिकाणे आणि रडारची माहिती मिळवण्याचा प्रयत्न फेसबुकच्या माध्यमातून करण्यात आला आहे. कानपूर येथील रहिवासी असलेल्या या जवानाच्या पत्नीच्या बँक खात्यातही काही संशयास्पद व्यवहार आढळून आले आहेत. याबाबत हवाई दलाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

असे ओढले जाळ्यात

दिल्ली पोलिसांना गेल्या 6 मे रोजी गुप्तचर संस्थेकडून माहिती मिळाली होती की, भारतीय हवाई दलाचा जवान देवेंद्र शर्मा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करत आहे. फेसबुकवरील एका महिला प्रोफाइलच्या अकाऊंटवरून त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आले आणि त्यानंतर भारताविषयी संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या गुप्तचर माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आणि देवेंद्र शर्मावर नजर ठेवण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचे  संकेत दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाले आहेत. देवेंद्र शर्माला हनी ट्रॅपमध्ये अडकवून भारतीय हवाई दलाशी संबंधित संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

( हेही वाचा: राजद्रोहाचा पहिला गुन्हा कोणावर दाखल करण्यात आला होता माहित आहे का? )

पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचा हात असल्याची शक्यता

महिलेने देवेंद्र शर्माकडून भारतीय हवाई दलाच्या रडारची स्थिती आणि हवाई दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पोस्टिंग आणि तपशील यासारखी संवेदनशील माहिती काढण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान, पोलिसांना जवानाच्या पत्नीच्या बँक खात्यात काही संशयास्पद व्यवहारही आढळून आले आहेत. गुन्हे शाखेने देवेंद्र शर्माला गुरुवारी सकाळी दिल्लीतील धौला कुवा येथून अटक केली. चौकशीत त्याने कबूल केले आहे की त्याने फेसबुकवर एका अनोळखी महिला प्रोफाइलशी मैत्री केली होती, त्यानंतर त्याला फोन सेक्सद्वारे सापळ्यात अडकवले गेले आणि नंतर त्यांच्याकडून संवेदनशील माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. भारतीय मोबाईल कंपनीच्या नंबरवरून ही महिला देवेंद्र शर्मा यांच्याशी बोलायची. सध्या पोलीस महिलेचा शोध घेत आहेत. या संपूर्ण कामात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचा संशय आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.