बांगलादेशामध्ये चालू असलेल्या अंतर्गत तणावाच्या पार्श्वभूमीवर ढाका इस्लामाबादकडून राजनैतिक पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. महंमद युनूस (Muhammad Yunus) बांगलादेशाला भारताऐवजी पाकिस्तान आणि चीन यांच्या जवळ नेऊ इच्छितात. याच प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत.
(हेही वाचा – BMC: आठ ते नऊ वर्षांपूर्वी महापालिकेला हस्तांतरीत झालेल्या त्या पडीक वास्तूत रंगणार नाटकांचे प्रयोग)
बांगलादेशाचे नौदलप्रमुख अॅडमिरल महंमद नझमुल हसन यांनी पाकिस्तानचे सैन्यदल प्रमुख सय्यद असीम मुनीर यांची भेट घेतली आहे. एका महिन्यापेक्षा अल्प कालावधीत दोन्ही देशांमधील ही दुसरी संरक्षण-स्तरीय बैठक आहे. तत्पूर्वी बांगलादेशाच्या सैन्याचे वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल एस्.एम्. कामरुल हसन यांनी असीम मुनीर यांची भेट घेतली.
एवढेच नाही, तर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस्.आय.च्या (ISI) एका शिष्टमंडळाने ढाका येथे बांगलादेश सैन्याचीही भेट घेतली आहे. बांगलादेशाच्या अंतरिम सरकारने पाकिस्तानसमवेत प्रादेशिक आणि संरक्षण संबंध भक्कम करण्यासाठी उचललेले हे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. दोन्ही देशांचे फारसे चांगले संबंध राहिलेले नाहीत. अशा परिस्थितीत पाकिस्तान आणि बांगलादेश जवळ आल्याने दक्षिण आशियातील (South Asia) समीकरणे पालटू शकतात. हे भारतासाठी चिंतेचे कारण असू शकते.
नझमुल हसन यांनी रावळपिंडी येथे असीम मनीर यांची भेट घेऊन नौदल सहकार्य आणि बहुराष्ट्रीय नौदल सराव यांमध्ये पाकिस्तानी नौदलाच्या सहभागाविषयी चर्चा केली. ते म्हणाले की, बांगलादेश सैन्य प्रादेशिक स्थिरतेला चालना देण्यासाठी पाकिस्तानसोबत सहकार्यावर भर देत आहे. पाकिस्तानी सैन्य बांगलादेशी सैन्यासाठी प्रशिक्षण सत्रे चालू करण्याची योजना आखत आहे. बांगलादेशानेही पाकिस्तानकडून शस्त्रे खरेदी केली आहेत.
बांगलादेश सैन्याचा एक भाग पाकिस्तानसमवेत सहकार्याचा आग्रह धरत आहे. या गटाचा असा विश्वास आहे की, यामुळे या प्रदेशात स्थिरता येईल. हे सहकार्य आतंकवाद आणि इतर सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यास मदत ठरू शकते. हे भारतासाठी चिंतेचे कारण बनू शकते. जर पाकिस्तानचा बांगलादेशामध्ये हस्तक्षेप वाढला, तर तो ईशान्येकडील राज्यांमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community