भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील वरिष्ठ अधिका-यांच्या प्रशिक्षणासाठी असलेली प्रमुख संस्था कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट(सीडीएम) अलीकडेच एक अंतर्गत अभ्यास केला आहे. या अभ्यासात कौटिल्य अर्थशास्त्र आणि भगवत् गीतेसारख्या प्राचीन भारतीय ग्रंथांचा लष्करी प्रशिक्षणात समावेश करण्याची माहिती एका वृत्तवाहिनीने प्रकाशित केलेल्या एका अहवालात दिली आहे.
लष्करी मुत्सद्दीपणासाठी ग्रंथ उपयुक्त
संरक्षण स्रोतांनी न्यूज 18ला दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचा उद्देश भारतीय सशस्त्र दलांमध्ये धोरणात्मक विचार आणि नेतृत्वाच्या संदर्भात निवडक प्राचीन भारतीय ग्रंथांचा शोध घेणे आणि त्यांच्याकडून सर्वोत्तम पद्धती आणि विचारांचा अवलंब करण्यासाठी एक रोडमॅप तयार करणे आहे. लष्करी मुत्सद्दीपणासाठी या ग्रंथांचा चांगला उपयोग होऊ शकतो, असे संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले. प्राचीन ग्रंथ आणि मनुस्मृती, नितीसारा आणि महाभारत यांसारख्या ग्रंथांचा अभ्यास दोन वर्षांसाठी केला जावा, तसेच प्राचीन भारतीय संस्कृती आणि सशस्त्र दलांसाठी त्याचे धडे यावर कार्यशाळा आणि वार्षिक चर्चासत्र आयोजित केले जावे, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.
सामरिक विचार महत्त्वाचे
महाभारत आणि अर्थशास्त्रातील अनेक सामरिक विचार आणि युद्ध कला आज देखील उपयुक्त आहेत, असे 2016 मध्ये आर्मी वॉर कॉलेजने आपल्या एका प्रकाशनात म्हटले आहे.
राजकारण करू नये-काँग्रेस
कॉंग्रेस पक्षाने मात्र या प्रस्तावावर आक्षेप घेतल्याची माहिती मिळत आहे. भारतीय लष्कराच्या प्रशिक्षणात या ग्रंथांचा समावेश करणे हे देशाच्या सशस्त्र दलांचे राजकीयकरण आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. किमान सरकारने लष्करी बाबींमध्ये राजकारण करू नये, असे काँग्रेस प्रवक्ते के.के. मिश्रा म्हणाले.
Join Our WhatsApp Community