राष्ट्रीय तपास यंत्रणेने रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट (Bengaluru Bomb Blast) प्रकरणाचा तपास तीव्र केला असून बॉम्ब पेरणाऱ्या संशयित दहशतवाद्याचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. दरम्यान, यासंदर्भात माहिती देणाऱ्यास १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाच्या तपासाची व्याप्ती वाढवली असून आता बॉम्ब बाळगणाऱ्या संशयित दहशतवाद्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. बॉम्ब ठेवणाऱ्या संशयिताची माहिती देणाऱ्यास १० लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.
एनआयएच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची चौकशी केली
यापूर्वी सीसीटीव्ही तपासादरम्यान संशयिताचा मुखवटा नसलेला फोटो सापडला होता. आता ते छायाचित्र एनआयएने प्रसिद्ध केले आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी कॅफेला भेट देऊन परिसराची पाहणी केली. कॅश काउंटर, सीसीटीव्ही कॅमेरे तपासून कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. पोलिसांनी एनआयए अधिकाऱ्यांना गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेल्या ३८ वेगवेगळ्या नमुन्यांची माहिती दिली आहे.
पोलिसांना महत्त्वाचे संकेत मिळाले
गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले की, बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या कमी-तीव्रतेच्या बॉम्बस्फोटासंदर्भात (Bengaluru Bomb Blast) पोलिसांना मोठा सुगावा मिळाला आहे आणि लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल. दोन दिवसांपासून तपास करत असलेल्या पोलिसांना आणखी काही महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत. ही बाब आम्ही गांभीर्याने घेतली आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी काही जणांना संशयावरून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून माहिती घेत आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने मंगळवारी या प्रकरणाची कसून चौकशी केली.
एनआयएने नागरिकांना अशी कोणतीही व्यक्ती दिसल्यास 080-29510900, 8904241100 या मोबाईल क्रमांकावर त्वरित माहिती देण्याची विनंती केली आहे. त्यांना संशयित आरोपींची माहिती असल्यास त्यांनी त्वरित संस्थेला कळवावे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
Join Our WhatsApp Community