भारत आणि चीनमध्ये सध्या अरुणाचल प्रदेश आणि लडाख यांच्या सीमा प्रश्नांवरुन तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने चीनच्या सीमेवर ब्रह्मोस मिसाइल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. आता यावर चीनी निरीक्षकांनी भारत सरकारच्या या योजनेची निंदा केली आहे. चीनने भारताला चेतावणी देत म्हटले की, भारताने उचललेल्या या पावलामुळे सीमेवरील तणाव अधिक वाढणार आहे.
चीनच्या अधिका-यांकडून नवी बोंब
ब्रह्मोस मिसाइल तैनात केल्याने एका बाजूला चीन अस्वस्थ झालेला दिसत असताना दुसरीकडे चीनने भारताच्या शस्त्रांना कमकुवत ठरवले आहे. भारताची मिसाईल ही केवळ देशाचा तात्विक लाभ आहे. चीनच्या सुरक्षेला याचा अजिबात धोका नाही, असा दावा ग्लोबल टाइम्समध्ये करण्यात आला आहे. “भारताच्या अशापद्धतीच्या निर्णयामुळेच दोन्ही देशातील वाद सातत्याने वाढत आहे आणि विनाकारण दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये कटुता निर्माण होत आहे”, अशी बोंब चीनी सैन्याचे अधिकारी सोंग झोंगपिंग यांनी ठोकली आहे.
भारताचे मिसाइल अचूक वेध साधणार
चीननेही देशाच्या शस्त्रसाठ्यातील घातक मिसाइल भारतीय सीमेजवळ तैनात केल्या आहेत. भारताच्या ब्रह्मोस मिसाइलचा कोणताच धोका चीनच्या सुरक्षेला नाही. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडे ब्रह्मोस सारख्या सुपरसोनिक क्रूझ मिसाइल पाडण्याची क्षमता आहे आणि त्यात येत्या काळात आणखी वाढ होणार आहे, असा दावा चीनने केला आहे. दोन्ही देशांमध्ये संघर्ष अटळ असल्यास युद्ध सुरू होण्याआधीच भारताच्या मिसाइल नष्ट करण्यात येतील, असाही दावा चीननं केला आहे.
(हेही वाचा : किळसवाणं सेलिब्रेशन…ही तर ऑस्ट्रेलियाची परंपराच )