सैन्यातील विशेषतः इंडियन मिलिटरी ॲकॅडमीतील (IMA) ब्रिटिशांचा प्रभाव कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न कायम असतो. आता हा प्रयत्न संरक्षण दलातील नावे बदलूनही करण्यात येणार आहे. करिअप्पा बटालियनमध्ये, कोहिमा, नौशेरा, पूँछ या ३ कंपनी आहेत. थिमय्या बटालियनमध्ये अलामेन, माइक तिला, सँग्रो या ३ कंपनी आहेत. माणेकशॉ बटालियनमध्ये इम्फाळ, जोझिला, जेस्सोर या ३ कंपनी आहेत. तर, भगत बटालियनमध्ये सिंहगड, केरेन, कॅसिनो या ३ कंपनी आहेत. या १२ कंपनींपैकी ७ कंपनींची नावे बदलण्याचा प्रस्ताव आहे. कोहिमा, अल अलामीन, माइकतिला, सँग्रो, इम्फाळ, कॅरन, कॅसिनो या कंपनींची नावे बदलून डोगराई, नथू ला, चुशूल, बगडाम, द्रास, बसंतर, वॅलाँग ही नावे या कंपन्यांना देण्याचा विचार होत आहे.
प्रत्येक कंपनीचे नाव भारतीय लष्कराचा सहभाग असलेल्या एका लढाईवरून देण्यात आले आहे. १२ कंपनींच्या १२ नावांतून १२ लढाया डोळ्यांसमोर उभ्या राहतात. त्यातील भारतीय जवानांनी बजावलेली कामगिरी आठवते. ज्या कंपनींची नावे बदलण्यात येणार आहेत, त्यांची नावे ज्या लढायांवरून ठेवली आहेत, त्या लढाया भारतीय सैनिकांनी स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशकाळात लढल्या आहेत. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाला ब्रिटिशांचा वारसा मिळाला आहे. या दलांची स्थापना ब्रिटिशांच्याच काळात झाली. या दलांमध्ये आणि विविध प्रकारच्या नावांमध्येही काळानुरूप यापूर्वीही बदल केले गेले आहेत. मात्र संरक्षण दलांचे भारतीयीकरण हा उपक्रम स्तुत्य आहे. याचे स्वागत एका बाजूने होत असताना दुसऱ्या बाजूने याला आक्षेप घेणारेही मते व्यक्त होत आहेत. (IMA)
Join Our WhatsApp Community