सीमा सुरक्षा दल ‘या’ राज्यांत राज्य पोलिसांप्रमाणे काम करणार!

बीएसएफचे जवान अंमली पदार्थ किंवा शस्त्रास्त्रांची तस्करी आणि बेकायदेशीर घुसखोरी विरूद्ध सीमावर्ती भागात कारवाई करू शकतात.

केंद्रीय गृह मंत्रालयाने सीमा सुरक्षा दलाचे (BSF) कार्यक्षेत्र वाढवले आहे. सीमा सुरक्षा दल गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार भारताच्या जमिनीवरील सीमांचे रक्षण करते. बीएसएफ अधिका-यांना पश्चिम बंगाल, पंजाब आणि आसाम या राज्यांमध्ये शोध, अटक आणि जप्तीचे अधिकार गृह मंत्रालयाने दिले आहेत. यामुळेच आता बीएसएफचे अधिकारी, राज्य पोलिसांप्रमाणे कारवाई करू शकतात.

बीएसएफला कोणते अधिकार मिळाले ?

या अंतर्गत बीएसएफ अधिकारी पश्चिम बंगाल, पंजाब आणि आसाम या  तीन राज्यांमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांच्या  सीमेपासून ५० किमी आतपर्यंत कारवाई करू शकतील, याआधी ही मर्यादा १५ किमी एवढी होती. पासपोर्ट कायदा, एनडीपीएस कायदा, सीमाशुल्क कायदा तसेच फौजदारी प्रक्रिया यासारख्या कायद्यांतर्गत शोध, जप्ती आणि अटक करण्याचे अधिकार बीएसएफ अधिका-यांना मिळणार आहेत.  या निर्णयामुळे बीएसएफचे जवान अंमली पदार्थ किंवा शस्त्रास्त्रांची तस्करी आणि बेकायदेशीर घुसखोरी विरूद्ध सीमावर्ती भागात कारवाई करू शकतात.

(हेही वाचा : खंडणीच्या गुन्ह्यातील तो ‘एक नंबर’ कोण? वाझेच्या चौकशीत होणार खुलासा)

इतर राज्यातील बीएसएफचे कार्यक्षेत्र

गुजरात राज्यात अंतर्गत सीमाक्षेत्र ८० किलोमीटरवरून कमी करून ५० किमी करण्यात आले आहे. राजस्थानमधील सीमाक्षेत्रात कोणताही बदल केला नसून, ईशान्येकडील मेघालय, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा आणि मणिपूर या राज्यांसाठी कोणतीही मर्यादा निर्धारित केलेली नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here