जनरल मनोज पांडेंनी घेतली संरक्षणमंत्र्यांची भेट

लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर नवनियुक्त सेनाप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मान्यवरांनी सेना, संरक्षण तसेच अन्य विषयांवर चर्चा केली. पांडे यांनी शनिवारी ३० एप्रिल रोजी निवर्तमान जनरल एम.एम. नरवणे यांच्याकडून पदभार ग्रहण केला आहे. देशाची सुरक्षा सर्वोच्च असून त्यासाठी कुठल्याही आव्हानांचा समाना करण्याची तयारी आहे. भारत-चीन यांच्यात संवाद प्रक्रिया सुरू आहे. परंतु, एलएसीवर कुठलीही चुकीची गोष्ट खपवून घेणार नसल्याचे सुतोवाच सैन्यप्रमुख मनोज पांडे यांनी केले आहे. पदभार ग्रहण केल्यानंतर त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ यांची भेट घेत आगामी धोरणांवर चर्चा केली.

२९ वे लष्करप्रमुख म्हणून स्वीकारला पदभार

जनरल मनोज पांडे यांनी भारतीय सैन्याचे २९ वे लष्करप्रमुख म्हणून शनिवारी पदभार ग्रहण केला. भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या निवृत्तीनंतर जनरल मनोज पांडे यांनी या पदाचा पदभार स्वीकारला आहे. सैन्य उपप्रमुख म्हणून काम केलेले जनरल पांडे हे दलाच्या इंजिनीअर कॉर्प्समधून लष्करप्रमुख होणारे पहिले अधिकारी ठरले आहेत. प्रामुख्याने ते सैन्याच्या पूर्व कमांडचे प्रमुख होते. ही कमांड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे रक्षण करण्यासाठी जबाबदार आहे.

(हेही वाचा – मनसेतर्फे अक्षय्य तृतीयेला होणारी महाआरती रद्द!)

अद्याप नवीन मुख्य संरक्षण प्रमुखाची नियुक्ती नाही

चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील आव्हानांसह भारताला असंख्य सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागत असताना, नौदल आणि हवाई दलाशी समन्वय साधावा लागेल, अशा वेळी जनरल पांडे यांनी लष्कराची कमान सांभाळली आहे.  भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, जे थिएटर कमांड तयार करण्याचे काम करत होते, त्यांचा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. सरकारने अद्याप नवीन मुख्य संरक्षण प्रमुखांची नियुक्ती केलेली नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here