भारताच्या उत्तरेकडील सीमेवर चीनकडून कायमंच कुरघोडी करण्यात येत असतात. उत्तरेत भारताने चीनला रोखून ठेवल्यामुळे आता अस्वस्थ झालेल्या चीनने ईशान्य भारतात घुसखोरी करण्यास सुरुवात केली आहे. ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेशच्या लॉंगजू या भारत-चीन सीमेदरम्यान असलेल्या क्षेत्रात चिनी सैन्याने एका खो-यात बांधकामाला सुरुवात केली आहे. त्याबाबतचा एक व्हिडिओ समोर येत आहे.
चीनकडून लष्करी सामर्थ्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हे बांधकाम करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत निवृत्त ब्रिगेडियर आणि सुरक्षा विषयक अभ्यासक हेमंत महाजन यांनी हिंदुस्थान पोस्टला माहिती दिली आहे.
चीनकडून बांधकाम
हा व्हिडिओ 11 ऑगस्ट रोजी तयार करण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेशचा बराचसा भाग हा नद्यांच्या खो-यांमुळे विभागला गेला आहे.या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले बांधकाम हे सुबान सिली खो-यातील आहे. याच खो-यात लॉंगजू हा प्रदेश आहे. या प्रदेशावर भारत आणि टीन दोन्ही देशांकडून दावा करण्यात येत आहे. त्यामुळे या भागात चिनी सैन्याकडून बांधकाम करण्यात येत आहे. या भागात भारताचे शेवटचे गाव अंजाव जिल्ह्यातील चांगलांग हे आहे.
भारताचे हालचालींवर लक्ष
पण हे बांधकाम जरी सुरू असलं तरी भारतीय सैन्याकडून या भागातील चीनच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. या व्हिडिओमुळे चीनने आक्रमण केल्याची माहिची आपल्याला मिळालेली नाही. सॅटेलाईट आणि ड्रोनच्या माध्यमातून सैन्याचे या बांधकामावर लक्ष आहे. पण हा भाग वादग्रस्त असल्यामुळे इथे आपण चीनला थांबवू शकत नाही, असे हेमंत महाजन यांनी म्हटले आहे. त्यामुळे या बांधकामामुळे भारताला कोणताही धोका नसून फक्त चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे आणि भारतीय सैन्य हे काम योग्य पद्धतीने करत असल्याचेही हेमंत महाजन यांनी स्पष्ट केले आहे.
पायाभूत सुविधा वाढवण्याची गरज
भारतीय सैन्य या भागातील गुराखी तसेच जनावरांना प्रत्यक्ष सीमा रेषेपर्यंत(LAC)जाऊन देत नसल्याचे तेथील लोकांचे म्हणणे आहे. त्यांनी हा व्हिडिओ काढला असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्गम आणि डोंगराळ भागात भारतीय सैन्याच्या बॉर्डर रोड ऑर्गनायजेशन कडून रस्ते बांधण्यात येत आहेत.
या भागात भारताने पायाभूत सुविधा वाढवण्याची गरज आहे. तसेच इथल्या लोकांनाही सीमेपर्यंत जाण्याची परवानगी भारतीय सैन्याकडून देण्यात यावी, जेणेकरुन चीनच्या हालचालींबाबत त्यांच्याकडूनही माहिती मिळणे सोपे होईल. कारण इंच-इंच जागेवर सैन्य तैनात करणं हे अजिबात सोपं नसतं त्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांचा देखील आपल्याला सुरक्षेच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो, असे महाजन म्हणाले.
Join Our WhatsApp Community