दंतेवाडातील १५ गावे होणार नक्षलमुक्त! महाराष्ट्रातही चालवले जाते ‘ते’ अभियान!

छत्तीसगड येथील दंतेवाडा जिल्ह्यातील १५ गावे ही नक्षलमुक्त होणार आहेत. स्वतंत्रता दिनी ही घोषणा होणार आहे.

172

येत्या १५ ऑगस्ट रोजी दंतेवाडा येथील १५ गावे नक्षलमुक्त म्हणून घोषित करण्यात येणार आहेत. हे जरी छत्तीसगड राज्याचे नक्षलमुक्तीच्या दिशेने छोटेसे पाऊल असले, तरी महाराष्ट्रातही असे प्रयत्न होत असतात. त्यासाठीही विविध अभियान राबवले जातात, ज्यामध्ये नक्षलग्रस्तांना शरण येण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यापासून ते वेळप्रसंगी त्यांना ठार करण्यापर्यंत सर्व प्रकारच्या मोहिमा राबवल्या जात आहेत.

नक्षलमुक्त गाव म्हणून घोषणा ग्रामपंचायत करते, पण… 

दंतेवाडा येथील १५ गावे नक्षलमुक्त होणार आहेत, यानिमित्ताने गडचिरोलीचे पोलिस उपायुक्त अंकित गोयल यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना नक्षलमुक्त गावे कशी होतात आणि महाराष्ट्रात कसे प्रयत्न सुरु आहेत,  याविषयी चर्चा केली. त्यावेळी बोलताना पोलिस उपयुक्त गोयल म्हणाले कि, एखादे गाव नक्षलमुक्त करण्याची घोषणा मुळात पोलिस करत नाहीत, ती संबंधित गावाची ग्रामपंचायत करते. त्यासाठीचा अध्यादेश अस्तित्वात आहे. ग्रामपंचायत ठराव मंजूर करते त्यानंतर संबंधित गाव नक्षलमुक्त म्हणून घोषित केले जाते. पण त्याआधी नक्षल भागात काम करणाऱ्या सीमा सुरक्षा दल, पोलिस यंत्रणा, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल या यंत्रणांची भूमिका महत्वाची ठरते. येथील नक्षलवादी कारवाया संपुष्टात आण्यासाठी संरक्षण यंत्रणा आधी प्रयत्न करतात. ज्याप्रमाणे दंतेवाडा येथील गावे नक्षलमुक्त म्हणून जाहीर करण्यात येणार आहेत, तशी महाराष्ट्रातील गडचिरोली या नक्षलग्रस्त भागातील गावेदेखील नक्षलमुक्त करण्यात आली आहेत, गडचिरोलीतील ४-५ गावे आहेत जेथे आता नक्षली कारवाया जवळजवळ संपुष्टात आल्या आहेत. जी आधी अतिसंवेदनशील गावांमध्ये समाविष्ट होती, असे गडचिरोली येथील पोलिस उपायुक्त अंकित गोयल म्हणाले.

नक्षलग्रस्त गाव नक्षलमुक्त व्हावा यासाठी पोलिस यंत्रणेसह स्थानिक प्रशासन अर्थात ग्रामपंचायत आणि जिल्हा पंचायत कार्यरत असतात. नक्षलवाद्यांचे मत परिवर्तन करणे, हेच आमच्यासाठी प्रथम प्राधान्य असते. त्यासाठी त्यांनी शरण यावे याकरता आम्ही विविध मोहिमा आखतो. गावात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विशेष प्रयत्न करत असतो. यामध्ये नक्षलवाद्यांना ठार करणे हा आमचा शेवटचा पर्याय असतो. मागील २ महिन्यापूर्वी आपण गडचिरोली येथून प्रभारी पोलिस अधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालो. माझ्या कारकिर्दीत २६ वेळा चकमकी घडवून आणल्या असल्या तरी नक्षलवाद्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी, विकासकामे करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले आहेत.
– हारून रिझवी, निवृत्त प्रभारी पोलिस उपअधीक्षक, गडचिरोली.

(हेही वाचा : ‘अशी थप्पड मारू कि उठणार नाही!’ उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा)

गावातील ग्रामस्थांमध्ये झाला सर्वे!

छत्तीसगड येथील दंतेवाडा जिल्ह्यातील १५ गावे ही नक्षलमुक्त होणार आहेत. स्वतंत्रता दिनी ही घोषणा होणार आहे. बारसुर २, गिदम २, भांसी ४, दंतेवाडा ५, कुआकोंडा १, फारसपाल १ अशी या गावांची संख्या आहे. याआधी या गावाचा सर्वे करण्यात आला. त्यामध्ये गावकऱ्यांना १० प्रश्न विचारले गेली. त्यामध्ये मगील १० वर्षांत गावात नक्षली कारवाई झाली का? नक्षलवाद्यांची बैठक झाली होती का?  गावात सुरक्षेशिवाय विकासकामे होतात का? अशा प्रश्नांचा समावेश होता. त्यामध्ये ज्या गावांमध्ये नक्षली कारवाया शून्य झालेल्या असतील. या गावांना नक्षलमुक्त म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दंतेवाडा जिल्ह्यातील ७५ गावे संवेदनशील!

दंतेवाडा जिल्ह्यातील ४२ गावे ही येलो, तर ३३ गावे ही रेड झोन म्हणजे अतिसंवेदनशील म्हणून ठरवण्यात आली आहेत. नक्षलवाद्यांना शरण येण्यासाठी चालवण्यात आलेल्या मोहिमा आणि मागील २ वर्षांत ४० हून अधिक नक्षलवाद्यांचा केलेला खात्मा यामुळे नक्षलवादी प्रभावहीन बनले आहेत.त्यामुळे येथील १५ गावे नक्षलमुक्त झाली आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.