धैर्यशील, द्रष्ट्या, कुशल रणनीतीकाराच्या निधनाने नि:शब्द झालो! – प्रविण दीक्षित

96

भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्युने अवघा देश हळहळतो आहे. देश एका पराक्रमी योद्ध्याला मुकला आहे. जनरल बिपीन रावत हे दूरदृष्टी लाभलेले, धैर्यवान, धाडसी तसेच कुशल रणनीतीकार होते. त्यांच्या अकाली निधनाने बसलेला धक्का नि:शब्द करणारा आहे, असे माजी पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित यांनी म्हटले आहे.

तंत्रज्ञानाने युक्त सैन्य दल हेच नेतृत्व करेल

मुंबई विद्यापीठाच्या एका सेमिनारमध्ये जनरल बिपीन रावत यांची भेट झाली होती. त्यावेळी आपल्याला जनरल बिपीन रावत यांचे विचार जाणून घेण्याची संधी मिळाली, अशी आठवण प्रविण दीक्षित यांनी सांगितली. त्यावेळी जनरल रावत यांनी ‘देशातील प्रत्येक व्यक्ती ही सुरक्षेशी जोडली गेली पाहिजे’, असे म्हटले होते. भविष्यात खासगी क्षेत्र, स्टार्ट अप आणि सैन्य दल यांनी संयुक्तपणे कार्य करण्यास तयार असले पाहिजे. तंत्रज्ञानाने युक्त सैन्य दल हेच ख-या अर्थाने नेतृत्व करू शकते. वर्ष 2030 च्या अनुषंगाने बिपीन रावत हे काही सूचना करताना, ‘सद्यस्थितीचे अचूक विश्लेषण करा, संसाधनांचा अधिकतर वापर करा, तसेच सैन्य दलात तंत्रज्ञान आत्मसात असलेले नेतृत्व निर्माण करा’, असेही म्हणाले होते.

बिपीन रावत यांच्या मतानुसार ‘ही’ आहेत मुख्य आव्हाने

आर्थिक क्षमतेनुसार सैन्याची रचना करावी लागेल, सैन्याला तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागेल. सैन्य दलाचा उपयोग राजकीय फायद्यासाठीही होत असतो, ज्यामध्ये विविध देशांत भारतीय वंशाचे रणनीतीकार महत्वाची भूमिका निभावत असतात म्हणून भारतीय हितांची जपणूक विश्वस्तरावर करणे हे आव्हानात्मक आहे आणि ते आंतरराष्ट्रीय दबाव विकसित होण्याआधीच कमीत कमी वेळेत साध्य करणे गरजेचे आहे. सैन्य दलातील विविध विभागांना एकमेकांशी संलग्न करण्याची गरज आहे. त्यांच्यामध्ये भेदभाव ठेवता कामा नये. सध्या संरक्षण दलातील विविध गुप्तचर विभागांचा आपापसात संवाद नाही त्यामुळे धोक्याची सूचना समजून घेणे गुंतागुंतीचे बनत आहे. सैन्य दलाला तंत्रज्ञानयुक्त बनवण्याची गरज आहे. क्षमता आधारित दृष्टीकोन आवश्यक आहे. गुप्तता पाळणे, देखरेख ठेवणे आणि त्यानुसार कारवाई करणे या प्रकारच्या कार्यपद्धतीत सुधारणा आवश्यक आहे. सॅटेलाईट तंत्रज्ञानात डीआरडीओ उत्तम कार्य करत आहे. आगामी काळात इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिस्टीम महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. सैन्य दल आणि प्रसारमाध्यमे यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. जेणेकरून एकसमान संदेश प्रसारित होईल. कारण खोट्या बातम्यांद्वारे विध्वंस हा शब्दप्रयोग करून अनेकदा भीती उत्पन्न केली गेली आहे. आर्टिफीशियल इंटेलिजन्स महत्त्वाचे आहे. सैन्याने शैक्षणिक क्षेत्राचाही फायदा घ्यावा. विद्वानांच्या साहाय्याने समस्यांचे निराकरण करण्यासाठी सैन्याने विशिष्ट विभाग विकसित करावा. जर तुम्ही नवनिर्मिती केली नाही, तर तुम्ही नष्ट व्हाल. देखरेख आणि संवाद यासाठी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना सीमेवर पाठवावे.

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, जनरल बिपीन रावत यांचे जीवन धैर्यशील, पराक्रमी आणि कुशल रणनीतीकार म्हणून ओळखले जाईल, जे भावी पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी असेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.