देवळाली आर्मी कॅम्पमध्ये सैनिकी वेषात घुसखोरी, कटकारस्थानाची शक्यता… 

77

नाशिक येथील देवळाली आर्मी कॅम्प सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे मानले जाते. या ठिकाणी सैनिकी प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे या ठिकाणची सुरक्षा अति कडक असते. असे असतानाही ही सुरक्षा भेदण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सैन्यातील जवानाचा गणवेष घालून एक व्यक्ती तोतया जवान बनून थेट या कॅम्पमध्ये घुसला. सुदैवाने त्याला पकडण्यात आले.

काय आहे प्रकरण?

गणेश वाळू पवार असे आरोपीचे नाव आहे, तो नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात राहतो. तो स्वतः सैन्यामध्ये अधिकारी नसतानाही सैन्य अधिकारी असल्याचे भासवून, जवानाचा गणवेश परिधान करून त्याने देवळाली आर्मी कॅम्पमध्ये घुसखोरी केली. कॅम्पमध्ये प्रवेश करून त्या तोतया जवानाने कॅम्पमध्ये फिरायला सुरुवात केली. काही वेळानंतर आर्मीच्या अधिकाऱ्याने त्या तोतया जवानाला थांबवून चॊकशी केली असता तो तोतया जवान असल्याचे आढळून आले. त्यावर त्याला लगेच ताब्यात घेऊन देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्यावर तोतयागिरीचा व फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा मालेगाव बॉम्बस्फोट : हिंदुत्ववाद्यांविरोधात कारस्थान! साक्षीदाराचा धक्कादायक खुलासा)

कॅम्पच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह!

दरम्यान एखादा व्यक्ती जवानांचा गणवेश घालून जर देवळाली येथील सैन्याच्या कॅम्पमध्ये घुसखोरी करत असेल आणि त्या ठिकाणी फिरत असेल, तर यामुळे या ठिकाणच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा भाग अतिसंवेदनशील समजला जातो. याठिकाणी भावी जवानांना प्रशिक्षण दिले जाते, तेथील माहिती गुप्त असते, अशा वेळी एखादा अतिरेकीदेखील असा जवानांचा गणवेश परिधान करून कॅम्पमध्ये घुसखोरी करू शकतो, अशी शक्यता या घटनेनंतर निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील सुरक्षेचा पुन्हा आढावा घेण्याची वेळ आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.