आता डीआरडीओ पुरवणार रुग्णालयांना ‘प्राणवायू’… अशी होणार ऑक्सिजन प्लांटची उभारणी

डीआरडीओने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करुन, अशा 500 मेडिकल ऑक्सिजन प्लांटची तीन महिन्यांत उभारणी करण्यात येणार आहे. पीएम केअर फंडातून याची उभारणी करण्यात येणार आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था(डीआरडीओ)ने विकसित केलेले मेडिकल ऑक्सिजन प्लांट तंत्रज्ञान आता कोविड-19 रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यास फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा भरुन काढण्यास मदत होणार आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

500 ऑक्सिजन प्लांट्सची उभारणी होणार

लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजससाठी हे तंत्रज्ञान डीआरडीओने विकसित केले आहे. दर मिनिटाला 1000 लिटर क्षमतेइतका ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी, या ऑक्सिजन प्लांटची रचना करण्यात आली आहे. डीआरडीओने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करुन, अशा 500 मेडिकल ऑक्सिजन प्लांटची तीन महिन्यांत उभारणी करण्यात येणार आहे. पीएम केअर फंडातून याची उभारणी होणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. बंगळूरच्या टाटा अॅडव्हान्स सिस्टीम लिमिटेड आणि कोइंम्बतूर येथील ट्रायडंट न्यूमॅटिक्स या कंपन्या अशा प्रकारचे 380 प्लांट देशभरातील विवध हॉस्पिटल्समध्ये उभारणार आहेत, त्यासाठी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यात आले आहे. तर उर्वरित 120 प्लांटची उभारणी सीएसआयआरशी निगडित असणा-या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम कडून करण्यात येणार आहे.

 

काय आहे प्लांटचे वैशिष्ट्य?

कोविड-19 रुग्णांची संख्या सध्या झपाट्याने वाढत असल्याने, रुग्णालयांना ऑक्सिजनच्या पुरवठ्याची कमतरता भासत आहे. हे मेडिकल ऑक्सिजन प्लांट 93 टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन तयार करण्यास सक्षम आहे. या प्लांटमधील ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड असल्याने, वैद्यकीय ऑक्सिजन सिलेंडरमध्ये हा ऑक्सिजन सहज भरता येऊ शकतो. तसेच अगदीच गरज भासल्यास थेट रुग्णाच्या बेडपर्यंत त्याचा पुरवठा केला जाऊ शकतो. या प्लांटमधील प्रेशर स्विंग अॅडजॉर्ब्शन आणि मॉलेक्युलर झिओलाईट तंत्रज्ञानाचा वापर करुन, हवेतून ऑक्सिजन तयार करणे शक्य होते.

(हेही वाचाः ईशान्य मुंबईतील रुग्णांचे ‘ते’ गोल्डन अवर्स भाजप साधणार! पुरवणार ‘प्राणवायू’)

ऑक्सिजनचा होणार वेळेत पुरवठा

सातत्याने ऑक्सिजनची गरज भासत असल्याने या ऑक्सिजन प्लांटचा वापर करुन, ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णालयांत ऑक्सिजन तयार करणे सोपे होणार आहे. त्यामुळे या रुग्णालयांना पुरवठादारांवर अवलंबून राहण्याची गरज नाही आणि त्यामुळे वेळच्या वेळी ऑक्सिजनचा पुरवठा करुन रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. भारतीय आर्मीकडून ईशान्य भारत तसेच लेह-लडाख मधील काही क्षेत्रांत या प्रकारचे प्लांट उभारण्यात आले आहेत. तर दिल्लीत या प्रकारचे 5 प्लांट उभारण्यात आले असून, त्याचा कोरोना रुग्णांसाठी वापर करण्यास सुरुवात देखील झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

संरक्षण मंत्र्यांनी मानले आभार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओच्या प्रयत्नांसाठी आभार मानले आहेत. सध्याच्या भीषण परिस्थितीतून बाहेर पडण्यास या मेडिकल ऑक्सिजन प्लांटमुळे नक्कीच मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. डीआरडीओ कडून या प्लांटच्या उभारणीसाठी रुग्णालयांना सर्व प्रकारची मदत करण्यात येईल, असे आश्वासन संरक्षण संशोधन आणि विकास संस्था(डीआरडीओ)चे अध्यक्ष सतीश रेड्डी यांनी दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here