९ तासांच्या चौकशीनंतर प्रदीप शर्मा एनआयए कार्यालयातून बाहेर! गूढ वाढले

या चौकशी दरम्यान त्याला जिलेटीन कांड्या आणि मनसुख हिरेन हत्येसंदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांची ९ तास एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली आहे. सकाळी दीड वाजता एनआयए कार्यालयात हजर झालेले प्रदीप शर्मा सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास बाहेर पडले आहेत. शर्मा यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आल्यामुळे या प्रकरणाशी त्याचा संबंध येतो की काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणातील गूढ वाढले आहे.

हिरेन मृत्यू आणि जिलेटीन काड्यांबाबत चौकशी

अॅंटिलिया बंगल्याजवळ जवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी बुधवारी एनआयएने तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची चार तास तर, एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांची साडे आठ तास चौकशी करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रदीप शर्मा यांना एनआयएने चौकशीसाठी बोलवून घेतले. गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास प्रदीप शर्मा हे एनआयए कार्यालयात दाखल झाले होते. ९ तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर शर्मा यांना सोडण्यात आले. सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास शर्मा हे एनआयए कार्यालयातून बाहेर पडले. या चौकशी दरम्यान त्याला जिलेटीन कांड्या आणि मनसुख हिरेन हत्येसंदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

(हेही वाचाः सीबीआयने परमबीर सिंग यांच्यासह चार जणांचे नोंदवले जबाब!)

काय आहे वाझेची कबुली?

सचिन वाझे याने प्रदीप शर्मा यांचे नाव घेऊन जिलेटीन कांड्या शर्मा यांनीच आणून दिल्या होत्या, असे वृत्त असून १४ मोबाईल सिम कार्ड पैकी एक सिम प्रदीप शर्मा हे स्वतः वापरत असल्याचा संशय एनआयएला आहे. ३ मार्च रोजी वाझे आणि विनायक शिंदे यांनी अंधेरी पूर्व येथे शर्मा यांची भेट घेतली होती, अशी देखील कबुली वाझे याने एनआयएला दिल्याचे समजते. याबाबत मात्र एनआयएकडून कुठलाही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here