तालिबानसोबत भारताची ‘या’ विषयांवर झाली पहिली औपचारिक चर्चा

95

अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य माघारी बोलावल्यानंतर अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीने अराजकता माजवली आहे. त्यामुळेच अफगाणिस्तानात असलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी आणि देशाच्या हितासाठी अनेक मुद्द्यांवर तालिबान सोबत औपचारिक चर्चा करायला भारताने सुरुवात केली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.

पहिली औपचारिक चर्चा

31 ऑगस्ट रोजी कतारमधील भारतीय राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबानच्या दोहा राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टॅनिकझाईची भेट घेत, विविध विषयांवर चर्चा केली. तालिबानच्या आग्रहाखातर ही भेट दोहा येथील भारतीय दूतावासात पार पडल्याचे भारताच्या वतीने सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः तालिबान्यांचे अमानुष कृत्य : नागरिकाला हेलिकॉप्टरला लटकावून काढली धिंड!)

या विषयांवर झाली चर्चा

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या भेटीत अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारतात सुखरुप परत आणण्यासाठी चर्चा करण्यात आली. तालिबानमधील भारतीयांना कुठल्याही प्रकारे त्रास न देता त्यांना सुखरुप भारतात परत पाठवण्यात सहाय्य करावे, असे भारताकडून सांगण्यात आले. यासोबतच तालिबानने अफगाणिस्तानच्या भूमीत कोणत्याही भारतविरोधी कारवायांना प्रोत्साहन देऊ नये, असेही या भेटीत भारताकडून सांगण्यात आले. भारतातही आतंकवादी कारवायांना कोणत्याही प्रकारे खतपाणी घालण्यात येऊ नये, असेही सांगण्यात आले आहे. भारताने सांगितलेल्या या विषयांवर तालिबान सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन स्टॅनिकझाई यांनी दिले आहे.

भारताबाबत तालिबान सकारात्मक

गेल्या काही दिवसांपासून तालिबानने भारताबाबात सकारात्मक दृष्टीकोन दाखवायला सुरुवात केली आहे. भारत आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा देश असून, दोन देशांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित करण्याची आपली इच्छा असल्याचे तालिबानकडून सांगण्यात येत आहे. अफगाणिस्तानातील भारतीय गुंतवणुकीचे तालिबान कडून स्वागत करण्यात आले असून, आपल्या योजनांवर भारताने आपले काम सुरू ठेवावे, असे तालिबानचे म्हणणे आहे. त्यासोबतच अफगाणिस्तानची जमीन कुठल्याही देशाच्या विरुद्ध कारस्थान करण्यासाठी वापरण्यात येणार नसल्याचेही तालिबानने स्पष्ट केले आहे.

(हेही वाचाः अफगाणिस्तानात तालिबान्यांचे नव्हे इसिसचे राज्य?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.