खडकवासला (Pune) येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या वाटचालीत एका ऐतिहासिक घटनेची नोंद झाली आहे. ‘एनडीए’च्या दीक्षान्त संचलनात प्रथमच मुलींच्या बटालियनने मानवंदना दिली. ( National Defence Academy and Naval Academy )
पहाटेच्या गुलाबी थंडीत बिगुल वाजल्यानंतर ‘एनडीए’तील ‘क्वाटर डेक’चा दरवाजा उघडताक्षणी विविध सुरावटींच्या तालावर संचलन करत खेत्रपाल मैदानावर लष्करी बँचचं आगमन झालं. त्यापाठोपाठ शिस्तबद्ध संचलन सुरू झालं. ‘एनडीए’च्या ७५ वर्षांच्या वाटचालीत प्रथमच मुलींची बटालियन दीक्षान्त संचलनात सहभागी झाली. या संचलनाची दखल खुद्द् राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतली. या घटनेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथम मुलींनी मानवंदना दिल्यामुळे ही घटना ऐतिहासिक असल्याचे जाहीर केले.
यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी महिलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात कराव्या लागणाऱ्या संघर्षाविषयी खेद व्यक्त करत त्या म्हणाल्या की, ‘यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करणारे छात्र पाहून मला आनंद होत आहे. महिला छात्रांना प्रशिक्षणातील अनुभव पुढील करियरमध्ये उपयोगी पडेल. बदलत्या युगानुसार नवीन युद्धनीती आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे.’
उत्कृष्ट कामगिरी करणारे कॅडेट प्रथम सिंग यास सुवर्णपदक, कॅडेट जतिन कुमार यास रौप्यपदक आणि कॅडेट हर्षवर्धन भोसले यास ब्राँझपदक देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ सन्मान ज्युलियन स्क्वाड्रन हेमंत कुमार यांनी स्वीकारला. समारंभाला सरसेनाध्यक्ष अनिल चौहान, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल अजयकुमार सिंह, एनडीए कमांडंट व्हॉइस ॲडमिरल अजय कोचर, चीफ इन्स्ट्रक्टर संजीव डोग्रा उपस्थित होते.
लष्करी वाहनातून संचलनाची पाहणी
मैदानावर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आगमनानंतर राज्यपाल रमेश बैस यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर रुबाबदार घोड्यांच्या शानदार बग्गीतून राष्ट्रपती मुर्मू यांचे खेत्रपाल मैदानावर आगमन झाले. छात्रांची मानवंदना स्वीकारत त्यांनी लष्करी वाहनातून संचलनाची पाहणी केली. यानंतर पदवी प्राप्त केलेल्या आणि दुसऱ्या वर्षातील कॅडेटनी दिमाखदार संचलन करून यशस्वीरित्या उत्तुंग कामगिरी करून दाखवली. चेतक हेलिकॉप्टर, जॅग्वार आणि सुखोई या लढाऊ विमानांनी दिलेली सलामी सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले. १४५व्या तुकडीत एकूण ३५३ छात्रांनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले.