संरक्षण क्षेत्रातील महत्वाचे पद असलेल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ(CDS)पदावर निवृत्त लेफ्टनंच जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बुधवारी चौहान यांच्या नावाची घोषणा केली आहे. भारताचे पहिले CDS जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर हे पद रिक्त होते. त्यांच्या जागी आता अनिल चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्र सरकारची घोषणा
मोदी सरकारकडून सीडीएस पदाची निर्मिती करण्यात आल्यानंतर जनरल बिपीन रावत यांची पहिले सीडीएस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या वर्षी 8 डिसेंबर रोजी रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि इतर अधाका-यांचाही या दुर्घटनेत अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे रावत यांच्यानंतर सीडीएस पद रिक्त होते. अखेर केंद्र सरकारकडून निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
कोण आहेत अनिल चौहान?
लेफ्टनंट जनरल अनिल चौहान हे भारतीय लष्कराचे निवृत्त अधिकारी आहेत. भारतीय लष्करात त्यांनी 40 वर्षे कर्तव्य बजावले आहे. या कारकिर्दीत त्यांनी सैन्य दलातील अनेक प्रमुख पदांची जबाबदारी पार पाडली आहे. जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतात होणा-या बंडविरोधी कारवायांचा चौहान यांना दांडगा अनुभव आहे. त्यामुळे सीडीएस पदासाठी त्यांचे नाव चर्चेत होते.
सीडीएस पद कसे निर्माण झाले?
कारगिल युद्धादरम्यान भूदल,हवाई दल आणि नौदल यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळेच कारगिल विजयानंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारने याची माहिती घेण्यासाठी समीक्षा समिती स्थापन केली होती. या समितीने तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्यासाठी सीडीएस पदाची शिफारस केली होती. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 24 डिसेंबर 2019 रोजी हे पद निर्माण केले.
Join Our WhatsApp Community