26/11…अफगाणिस्तानातील अमेरिकेची बेवारस शस्त्रास्त्रे भारतासाठी धोकादायक

अफगाणिस्तानातून अमेरिकेने सैन्य माघार घेतल्यावर लागलीच तालिबान्यांनी दहशतीच्या जोरावर तेथील अमेरिका पुरस्कृत सरकार उलथवून टाकले. त्यावेळी अफगाण सैन्यांनी अमेरिकेने दिलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे जागेवरच टाकून पळ काढला. आता तिच बेवारस शस्त्रास्त्रे भारतासाठी धोकादायक बनली आहेत, अशा शब्दांत धोक्याचा इशारा माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिला आहे.

सुरक्षा यंत्रणांना इशारा 

मुंबई हल्ल्याला शुक्रवारी, २६ नोव्हेंबर रोजी १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रवीण दीक्षित यांनी दिलेला हा इशारा सुरक्षा यंत्रणेला सजग करणारा आहे. प्रवीण दीक्षित यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मिळालेल्या वृत्तानुसार असे दिसून आले आहे की, ‘लष्कर-ए-तोयबाचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद हा अफगाणिस्तानात अमेरिकन सैन्य सोडून गेलेली शस्त्रास्त्रे जमा करत आहे आणि जिहादींना एकत्र करत आहे. मुंबईवर ‘२६/११’ चा दहशतवादी हल्ला या हाफिज सईद यानेच केला होता, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी सतर्क राहण्याची गरज आहे.’

भारताला सतर्कतेची गरज 

सध्या अफगाणिस्तानात तालिबानी राजवट असली तरी त्या राजवटीला जगाने मान्यता दिली नाही. तरीही या राजवटीला पाकिस्तान आणि चीनचे समर्थन आहे, हे दोन्ही देश भारताचे शत्रू आहेत. सध्या अफगाणिस्तानात विविध दहशतवादी संघटनांचे प्रस्थ वाढले आहे. त्यामध्ये पाकिस्तानातील दहशतवादी संघटनाही अफगाणिस्तानात सक्रिय आहेत. ज्यामध्ये मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद याची लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना अफगाणिस्तानात सक्रिय आहे. अशा पार्श्वभूमीवर प्रवीण दीक्षित यांनी दिलेला इशारा देशाच्या संरक्षण यंत्रणेसाठी महत्वाचा आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here