ओएनजीसीच्या जहाज अपघाताची आता समिती करणार चौकशी

एका महिन्यात या समितीला चौकशीचा अहवाल सादर करावयाचा आहे.

तौक्ते चक्रीवादळात ओएनजीसीची जहाजे अडकून पडण्यामागील घटनांची चौकशी करण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळा(ओएनजीसी)ची अनेक जहाजे आणि त्यांवरील 600 होऊन अधिक लोक, तौक्ते चक्रीवादळाच्या वेळी किनाऱ्याजवळील सागरी भागात अडकून पडले होते. अशा अडकण्यामुळे तसेच वाहून जाण्यामुळे व अन्य कारणांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

काय आहेत समितीवरील जबाबदा-या?

  • ही जहाजे अडकणे व वाहून जाणे याला कारणीभूत ठरलेल्या घटनाक्रमाची, तसेच अन्य प्रसंगांची चौकशी करणे.
  • हवामानशास्त्र विभाग आणि अन्य वैधानिक अधिकरणांनी दिलेल्या पूर्वसूचना पुरेशा विचारात घेतल्या घेल्या होत्या का व त्यावर उचित कार्यवाही झाली होती का, याची चौकशी करणे.
  • जहाजांच्या सुरक्षेशी संबंधित तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित प्रमाणित कार्यान्वयन प्रणाली(एसओपी)चे योग्य पद्धतीने अनुसरण झाले होते का, याची चौकशी करणे.
  • जहाजे अडकण्यास व वाहून जाण्यास कारणीभूत ठरलेल्या व्यवस्थेतील त्रुटी दाखवून देणे.
  • अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिफारशी करणे.

(हेही वाचाः अखेर ओएनजीसीचे ‘ते’ जहाज बुडाले, ८३ जण बेपत्ता! )

हे आहेत समितीतील सदस्य

या समितीत जहाजबांधणी महासंचालक अमिताभ कुमार, हायड्रोकार्बन महासंचालक एस.सी.एल.दास आणि संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव नाझली जाफरी शायीन यांचा समावेश असून, संबंधित घटनांची चौकशी ही समिती करणार आहे. गरज भासल्यास ही समिती आणखी काहींचा समावेश करुन, त्यांचे सहकार्य घेऊ शकते. एका महिन्यात या समितीला चौकशीचा अहवाल सादर करावयाचा आहे.

(हेही वाचाः अजून ८५ जण बेपत्ता! नौदलाचे शर्थीचे प्रयत्न सुरूच! )

जहाजाचा नांगर दूर गेल्याने भरकटले जहाज

मुंबईजवळच्या अरबी समुद्रात ‘बॉम्बेहाय’ असून, तेथे तेल उत्खनन होते. याच परिसरात हिरा ऑईल क्षेत्र असून, याठिकाणी ‘ओएनजीसी’चं जहाज पी ३०५ उभे होते. दरम्यान, कोकण किनारपट्टी ओलांडून तौक्ते चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने सरकले. त्यानंतर जहाज अपघातग्रस्त झाले. चक्रीवादळाबरोबरच प्रचंड मोठ्या लाटा येत असल्याने जहाजाचा नांगर दूर गेला आणि जहाज भरकटायला लागले. त्यानंतर जहाजावरुन नौदलाला संदेश पाठवण्यात आला. या जहाजांच्या मदतीला आयएनएस कोच्ची आणि आयएनएस कोलकाता या दोन मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आलया होत्या. या जहाजावरील २७३ कामगारांना ताबडतोब वाचवण्याचे आव्हान होते. नौदलाने त्यातील १८८ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. अजूनही ८५ जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढण्यासाठी नौदलाचे बचाव कार्य सुरुच आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here