अरुणाचल प्रदेशमधील तवांग सेक्टरमध्ये चिनी सैन्याचा घुसखोरीचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला. चीनच्या घुसखोरीला रोखताना दोन्ही बाजूने संघर्ष झाला. यामध्ये दोन्ही बाजूचे सैन्य जखमी झाले आहेत. जखमी भारतीय जवानांवर गुवाहाटीमधील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जवळपास 300 ते 400 चिनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. चिनी सैन्यातही अनेकजण जखमी झाले असल्याचे म्हटले जात आहे. 9 डिसेंबर रोजी ही घटना घडली. तवांगमधील प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडण्यासाठी चीनने आधीच पूर्ण तयारी केली होती.
( हेही वाचा: India China Faceoff: अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये चकमक )
मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास भारत-चीन सैन्यात संघर्ष
भारत आणि चीनदरम्यान आंतरराष्ट्रीय सीमा अद्याप निश्चित नाहीत. दोन्ही देशांदरम्यान 300 किमीची प्रत्यक्ष ताबा रेषा (LAC) आहे. 9-10 डिसेंबरच्या मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास तवांग पूर्व येथील Yangste पाॅईंटवर भारत-चीनच्या सैन्यात संघर्ष झाला. एका खासगी वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, Yangste पाॅईंट हा एक ओढा आहे. या ओढ्याच्या एका बाजूला चिनी सैन्य तर दुस-या बाजूला भारतीय सैन्य आहे. चिनी सैन्याकडून या ठिकाणी घुसखोरी होईल, असे कोणतेही संकेत, हालचाली दिसून आल्या नाहीत. 9 डिसेंबर रोजी मध्यरात्री 300 ते 400 चिनी सैन्याने ओढा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली. या दरम्यान, हाणामारीचा आवाज, गोंधळ ऐकू आल्यानंतर तातडीने 70 ते 80 जवानांना पाठवण्यात आले. भारतीय सैन्याने चिनी घुसखोरांना हुसकावण्यासाठी तयारी केली होती.
भारत आणि चीनच्या सैन्यात काही तास हाणामारी सुरु होती. या संघर्षात एकही गोळी झाडली गेली नाही. मात्र, लाठी- काठी, दगडांचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय सैन्याने मोठ्या निर्धाराने चिनी सैन्याला आपल्या हद्दीतून हुसकावले.
चीनने साधली संधी
चिनी सैन्य घुसखोरीसाठी सज्ज होते. ज्या ठिकाणी संघर्ष झाला, त्या ठिकाणी घनदाट जंगल आहे. चीन आपल्या बाजूने पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न करत होता. काही दिवसांपूर्वी या भागात बर्फवृष्टी झाली. त्याशिवाय, ढग दाटून आले होते. त्यामुळे भारतीय सॅटेलाइट्सला चिनी सैन्याच्या हालचाली टिपण्यास अडथळे येत होते. त्यानंतर भारतीय सैन्याने रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल जिओलोकेशन इक्पिमेंटचा वापर करुन सॅटेलाईट इमेज घेतल्या आहेत. चीनने ज्या ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न केला, तो भाग समुद्रसपाटीपासून 14 ते 17 हजार फूट उंच आहे. चीनकडून याआधीदेखील घुसखोरीचा प्रयत्न झाला होता. मात्र, सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने चिनी सैन्याचा मध्यरात्रीचा घुसखोरीचा डाव उधळून लावला.
Join Our WhatsApp Community