पूर्वी लडाखमधील वादाबाबत भारत आणि चीन दरम्यान, लष्करी पातळीवरील चर्चा होऊनही चीनची लढाऊ विमाने अनेक वेळेस प्रत्यक्ष ताबा रेषेजवळून उड्डाण करत असल्याचे, भारतीय अधिका-यांनी म्हटले आहे. भारतीय हवाई दल ही परिस्थिती अत्यंत जबाबदारीने हाताळत असून, तणाव वाढणार नाही, याची काळजी घेत आहे.
चीनची लढाऊ विमाने गेल्या तीन ते चार आठवड्यांपासून पूर्व लडाखमधील ताबा रेषेजवळून सातत्याने उड्डाण करत आहेत. पूर्व लडाखमधील सैन्य माघारीबाबत भारत आणि चीनमध्ये लष्करी पातळीवर चर्चेच्या फे-या सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच चर्चेची एक फेरी झाली आहे, असे असतानाही चीनच्या जे-11 या लढाऊ विमानांनी ताबा रेषेजवळून अनेक वेळा उड्डाण केले असून, काही वेळेस विश्वास रेषेच्या आत दहा किलोमीटरपर्यंत घुसत नियमांचा भंगही केला आहे. गेल्या महिन्यात, 24 जूनच्या आसपास चीनच्या लढाऊ विमानांनी सर्वप्रथम पूर्व लडाखमधील संघर्षबिंदूंच्या अत्यंत जवळून या विमानांनी ताबा रेषेजवळून वारंवार उड्डाण केले.
( हेही वाचा: “लंचटाइम आहे नंतर या”, हे बँकेत चालणार नाही )
भारताकडून देखरेख
चिनी विमानांच्या चिथावणीच्या पार्श्वभूमीवर हवाई दलानेही देखरेख सुरु केली आहे. चिनी विमानांच्या उड्डाणांची पद्धत अभ्यासली जात आहे. कोणत्या भागातून ते कमी उंचीवरुन उडतात, हेदेखील अभ्यासले जात आहे. लष्करी हालचालींसाठी या भागातील पायाभूत सुविधांच्या विकासकामालाही भारताने वेग आणला आहे. भारतीय हवाई दलाने मिग-26 आणि मिराज-2000 ही लढाऊ विमाने सीमारेषेपासून जवळ असेलल्या हवाई तळांवर सज्ज ठेवली आहेत. तसेच, अंबाला येथे राफेल विमानेही सज्ज असून ती अल्पकाळात ताबा रेषेजवळ पोहोचू शकतात. लडाख भागातूनही चीनच्या नियंत्रणाखालील भागावर देखरेख ठेवणे अधिक सोपे झाले आहे.
Join Our WhatsApp Community