माझगाव डॉकयार्ड लिमिटेड या कंपनीतर्फे निर्मित पी 17 ए या मालिकेतील लढाऊ युद्धनौकेचे जलावतरण करण्यात आले. एनडब्ल्यूडब्ल्यूए (पश्चिम विभाग) अध्यक्ष चारू सिंह यांच्या हस्ते हे जलावतरण करण्यात आले असून त्यांनी या जहाजाचे नामकरण ‘तारागिरी’ असे केले.
या कार्यक्रमाला, पश्चिमी नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हॉईस अॅडमिरल अजेंद्र बहादूरसिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. युध्दनौका निर्मिती आणि अधिग्रहण विभागाचे नियंत्रक व्हॉईस अॅडमिरल किरण देशमुख यांच्यासह भारतीय नौदल आणि केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या जलावतरण कार्यक्रमात भाग घेतला. यापूर्वी अनेक यशस्वी पारंपारिक जलावतरणांना पाठबळ पुरविणाऱ्या युद्धनौका संरचना ब्युरो (WDB) आणि माझगाव डॉकयार्डच्या (MDL) पथकांनी त्यांच्या नैपुण्यात अधिक भर घातली असून या जलावतरणाच्या रूपाने भारतीय नौदलाच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोचला आहे. या कार्यक्रमानंतर, ‘तारागिरी’ नौका मुंबई डॉकयार्डतर्फे निर्मित अशाच पद्धतीच्या दोन युद्धनौकांसोबत भारतीय नौदलाच्या माध्यमातून अपूर्व पराक्रम करून दाखविण्यासाठी देशाच्या सेवेत रुजू झाली आहे.
पी 17 ए या मालिकेतील सात युद्धनौका सध्या MDL आणि GRSE यांच्या तर्फे निर्मितीच्या विविध अवस्थांमध्ये आहेत. गुंतागुंतीच्या प्रणाली असलेल्या अशा लढाऊ नौकांच्या देशांतर्गत निर्मितीमुळे जहाजबांधणीच्या क्षेत्रात देशाने नवी उंची गाठली आहे. या निर्मितीमुळे, भारतीय जहाजबांधणी क्षेत्रातील कंपन्या, त्यांचे उप-कंत्राटदार तसेच संबंधित उद्योगांसाठी आर्थिक विकास, रोजगार निर्मिती असे विविध प्रकारचे अतिरिक्त फायदे झाले आहेत. तसेच प्रकल्प 17ए साठी आवश्यक असणाऱ्या साहित्यापैकी 75 टक्के साहित्य भारतीय एमएसएमई उद्योगांकडून खरेदी करण्यात आल्यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाच्या पूर्ततेसाठी देखील देशाला पाठबळ मिळत आहे.
(हेही वाचा – लम्पी आजारापासून पशुधन वाचविण्यासाठी तातडीने पावले उचला; मुख्यमंत्र्यांचे निर्देश)
यावेळी बोलताना पश्चिमी नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हॉईस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंह यांनी लढाऊ जहाजबांधणी क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या बाबतीत असलेले देशाचे स्वप्न साकार करण्यासाठी माझगाव डॉकयार्ड जहाजबांधणी कंपनी, युद्धनौका संरचना ब्युरो यांचे कर्मचारी तसेच इतर नौदल पथकांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले की, ‘तारागिरी’ ही युद्धनौका जेव्हा समुद्रात कामगिरीवर जाईल तेव्हा ती नौदलाच्या सामर्थ्यामध्ये नक्कीच अधिक भर घालेल.
Join Our WhatsApp Community