आशिया चषक स्पर्धेसाठी भारताने आपला संघ पाकिस्तानमध्ये पाठवला नाही तर आम्ही भारतात वर्ल्डकप खेळायला येणार नाही अशी भूमिका पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारताने सुद्धा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला व्हिसा नाकारल्याची माहिती समोर आलेली आहे.
( हेही वाचा : बेस्ट उपक्रम ग्राहकांना देणार अत्याधुनिक सुविधा! खंडित वीजपुरवठा होणार त्वरित सुरळीत)
व्हिसा नाकारला…
भारतामध्ये ५ ते १७ डिसेंबर या कालावधीमध्ये अंध क्रिकेट विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. यासाठी पाकिस्तान अंध क्रिकेट परिषदेने भारताकडे व्हिसा देण्याची विनंती केली होती. परंतु भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत मंजुरी देण्यात आलेली नाही. व्हिसा न मिळाल्यामुळे आता पाकिस्तानचा संघ अंध क्रिकेट विश्वचषकात सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे आता यासंदर्भात काय घडामोडी घडतात यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०२३ च्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी काय भूमिका घेणार ?
भारतात पुढच्यावर्षी ICC चा वनडे क्रिकेट विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. या विश्वचषकात आपण सहभागी होणार नाही अशीही धमकी पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने दिली होती. यामुळे भारताने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तान संघ जरी आम्ही विश्वचषकात सहभागी होणार नाही अशी धमकी देत असला तरी त्यांना खेळायचे आहे हे निश्चित आहे. त्यामुळे २०२३ च्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारत काय भूमिका घेणार याकडे सुद्धा क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.