लडाखमध्ये चीनप्रमाणेच भारतही तोडीसतोड सैन्यबळाने सज्ज! ब्रिगेडियर हेमंत महाजन यांची माहिती

चीन पूर्व लडाखमध्ये पेंगॉन्ग सरोवरावर पूल बांधत असून भारताविरोधात युद्धाची वेळ आल्यास सैन्याची जमवाजमव करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. तसेच ते तेथील रस्त्यांचे रुंदीकरण करणे, पर्यायी मार्ग तयार करणे ही कामेही करीत असून अक्साई चीनवर आपली पकड अधिक बळकट करण्याचे चीन प्रयत्न करीत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र वातावरण अतिशय थंड असलेल्या स्थितीत चीन सुमारे ६० हजार सैनिक तैनात करण्याच्या तयारीत आहे, तर भारतही जशास तसे उत्तर देण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना दिली.

(हेही वाचा : मुंबईत कोविड रुग्णांची ‘दस हजारी’ पार )

रोबोचा वापर करण्यास सुरुवात

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरचे मानद संचालक असलेले ब्रिगेडियर महाजन यांनी मंगळवारी ४ जानेवारी २०२२ या दिवशी ऑनलाईन व्याख्यानात बोलताना ही माहिती दिली. लडाखमध्ये अतिशय कडाक्याची थंडी असून चीनच्या सैनिकांना तेथे काम करणे अतिशय अवघड होत आहे. या थंडीमध्ये कोणत्याही प्रकारचा संघर्ष होणे शक्य नाही. त्याचप्रमाणे या थंडीमुळे चीनने तेथे आपल्या सैनिकांना थंडीचा होणारा त्रास, त्यांची सैनिक संख्या आणि नाराजी लक्षात घेत रोबोचाही वापर करण्यास सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले.

सैन्याची पुनर्रचना

भारतीय लष्कराच्या तयारी संबंधात सूत्रांनी दिलेल्या माहितीचा हवाला देत त्यांनी सांगितले की, भारतीय लष्कर एलएसीचा पासही खुला ठेवत आहे, जेणेकरून गरज पडल्यास सैन्याला वेगाने हलवता येईल. भारताने आपली ताकद वाढवली असून संरक्षण मंत्रालयाने आपल्या वार्षिक आढाव्यात अलीकडेच म्हटले आहे की, चीनच्या लष्कराने एलएसीच्या बाजूने एकापेक्षा जास्त भागात स्थिती बदलण्यासाठी एकतर्फी आणि चिथावणीखोर कारवाई केली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांचे लष्कर विविध स्तरांवर चर्चा करत आहेत. धोका लक्षात आल्यानंतर सैन्याची पुनर्रचना करण्यात आली आहे. प्रादेशिक अखंडता सुनिश्चित करण्यासाठी लष्कराचा आदेश लक्षात घेऊन, धोक्याचे मूल्यांकन आणि अंतर्गत विचारविनिमय केल्यानंतर, सैन्याची पुनर्रचना करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here